मुंबई : दारूच्या नशेत गडकिल्ल्यांवर जाऊन गैरवर्तन करणाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे. या बाबतचा आदेश शनिवारी राज्याच्या गृहविभागाने शनिवारी काढला.
सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गैरशिस्तीने वागल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५ अंतर्गत शिक्षेची जी तरतूद आहे ती आता गडकिल्ल्यावर दारु पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे.
या तरतुदीनुसार आता गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्या तळीरामांवरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास सहा महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपये इतका दंड आकारला जाईल. ही शिक्षा सहा महिन्यांपर्यंतची असली तरी ती तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी देता येणार नाही आणि समजा दिली तर त्याची कारणे न्यायालयाने द्यावी लागतील. ही शिक्षा पहिल्या अपराधासाठी असेल.नंतरच्या अपराधासाठी एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपये इतक्या दंडाची शिक्षा असेल. शिक्षेच्या या तरतुदींचा उल्लेख असलेला फलक पुरातत्व विभागामार्फत किल्ल्यावर दर्शनी भागात लावणे अनिवार्य असेल.