मुंबई: राज्यातील कोरोनाग्रस्तांपैकी १२ जणांच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं काहीसा दिलासा मिळाला असताना आणखी ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील ५, तर अहमदनगरमधील एकाला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०७ वर पोहोचलाय. आज राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १० नं वाढ झालीय. काल रात्रीपर्यंत राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ९७ होती. मात्र आज सकाळी पुण्यात ३, तर साताऱ्यात एक रुग्ण आढळून आला. यानंतर आता मुंबई आणि नगरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ वर पोहोचलीय. तत्पूर्वी राज्यातील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती काल समोर आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 97वर गेली होती. सांगलीतल्या 4, मुंबईतल्या 3 आणि साताऱ्यातल्या एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली होती. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरून आल्याची माहिती मिळाली होती.दरम्यान मुंबई महापालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूची लागण झालेल्या 12 रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. यामुळे, पालिकेच्या आरोग्य विभागाला या रुग्णांना बरे करण्यात मोठे यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या 12 रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं काल काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी जनतेशी संवाद साधत राज्यात संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. त्याआधी राज्यात जमावबंदी लागू होती. मात्र तरीही अनेक जण रस्त्यानं प्रवास करत असल्यानं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्यानं संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात येत असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. परिस्थिती सध्या धोकादायक वळणावर असून सर्वांनी घरीच राहावं असं कळकळीचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला केलं.
Coronavirus: राज्याच्या चिंतेत आणखी भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा १०७ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 4:34 PM