मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगच्या सहा जणांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. सतीश कांबळे उर्फ सत्या (३२), विनोद हांडे (३२), राहुल तिवारी (२४), सचिन शेळके (२९), रिझवाना शेख (३८), अश्विनी रानीत (२१) अशी त्यांची नावे आहेत. गुजरातमधील एका व्यावसायिकाच्या हत्येचा कट त्यांनी आखला होता. ७.६५ बोअरच्या पिस्तुलासहित ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. दाऊदचा भाऊ अनिस याच्या सांगण्यावरून गुजरातमधील एका व्यावसायिकाच्या हत्येचा कट या टोळीने आखला होता. त्यानुसार शेख आणि रानीत हिने तीन वेळा गुजरातमध्ये जाऊन ठिकाणाची रेकीसुद्धा केली. तर अनिसने हत्येसाठी लागणारा पाठविलेला पैसा अश्विनी हिने वठवून तो अन्य साथीदारांपर्यंत पोच केला होता. मात्र गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वस्त यांच्या पथकाने डी गँगचा हा डाव उधळून लावला आहे. वस्त यांच्या नेतृत्वातील पथकाने या दोघींसह सहाही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपासासाठी त्यांना राजकोट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (प्रतिनिधी)>अनिसच्या सांगण्यावरून शार्प शूटर असलेल्या रामदास रहाणे याला राजकोट पोलिसांनी २५ फेब्रुवारीला अटक केली. अनिसने त्याला जामनगरमधील व्यावसायिकाच्या हत्येसाठी १० लाख रुपये दिल्याचे तपासात समोर आले. रहाणे याने यापूर्वी व्यावसायिक मनिष ढोलकीया यांच्या कार्यालयावर गोळीबार केला होता. त्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता.
‘डी’ गँगच्या सहा जणांना शस्त्रासह अटक
By admin | Published: March 07, 2017 1:44 AM