ठाणे : सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाने मोठी कारवाई करत बडे मासे गळाला लावले. ठाणे जिल्ह्यातील काळू धरण बांधकामाचा ४५१ कोटी रुपयांच्या कामाचा ठेका मिळवण्यात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह सहा जणांविरुद्ध ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. बाबर यांच्याविरुद्धचा हा दुसरा गुन्हा आहे. राज्य सरकारने १२ धरणांच्या चौकशीचे आदेश दोन वर्षांपूर्वी दिले होते. डिसेंबर २०१४पासून एसीबी चौकशी करत आहे. रायगडच्या बाळगंगाप्रकरणी २५ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे, तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील काळू धरणाच्या प्रकल्पाचीही एसीबी चौकशी करत आहे. ठेकेदार खत्री यांना या कामाचा ठेका मिळावा म्हणून कोकण महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाबासाहेब पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता सतीश वडगावे, कार्यकारी अभियंता जयवंत कासार व तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता हरिदास टोणपे यांनी नियम धाब्यावर बसवून मदत केली. मूळ निविदेची किंमत ही ४२१ कोटी रुपयांच्या कामांची होती. ती ४५१ कोटी रुपये करण्यात आली. त्यापैकी १०८ कोटी रुपये ठेकेदाराला मिळाले. धरणाचे काम २५ टक्के झाले असून ते बंद पडले आहे, ही बाब समोर आल्याने या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाच्या बांधकामासाठी २००९ मध्ये निविदा मागवल्या होत्या. प्रकल्पाचा ठेका मिळवण्यासाठी महालक्ष्मी, रवासा, एफए एंटरप्रायजेस आणि एफए कन्स्ट्रक्शन या चार कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. त्यातील महालक्ष्मी आणि रवासा या दोन वेगळ्या कंपन्या होत्या, तर एफए एंटरप्रायजेस आणि एफए कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंपन्या एकाच ठेकेदाराच्या म्हणजे निसार खत्री यांच्याच होत्या. पण, ठेका मिळवण्यात स्पर्धाच असू नये, म्हणून खत्री यांनीच चारही कंपन्यांची प्रत्येकी २५ लाख रुपयांप्रमाणे एक कोटीची बँक गॅरंटी भरली होती. निविदा प्रक्रियेसाठी उर्वरित कंपन्यांच्या नावाने बनावट निविदा भरणे, इसारा रकमेचा डिमांड ड्राफ्ट देणे आदी बेकायदेशीर कृत्ये केल्याचे चौकशीत आढळले. ठेका देताना स्पर्धा न होण्यासाठी बाबर यांच्यासह पाटबंधारे विभागाचे पाच अधिकारी आणि एफए एंटरप्रायजेसच्या उर्वरित भागीदारांनी त्यांना सहकार्य केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)>शासनाची फसवणूक...एफए एंटरप्रायजेसने बनावट कागदपत्रे तयार करून आणि ती खरी असल्याचे भासवून निविदा आणि बँक गॅरंटी केआयडीसी (कोकण पाटबंधारे विकास महामंडळ)च्या कार्यालयात सादर करून टेंडर प्रक्रियेत भाग घेतला. अशा प्रकारे त्यांनी गुन्हेगारी कृत्य आणि कट करून केआयडीसी आणि पर्यायाने शासनाची फसवणूक केली. यावरून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल अहेर यांनी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठेकेदारासह सहा जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: June 28, 2016 5:40 AM