ऑनलाइन लोकमत -
ठाणे, दि. 01 - चेकमेट कंपनीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या दरोड्यात एका आजी आणि एका माजी कर्मचा-याचादेखील समावेश असल्याचं उघड झालं असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. नितेश आव्हाड, अमोल कार्ले, आकाश चव्हाण, मयुर कदम, उमेश वाघ आणि हरिश्चंद्र माने अशी आरोपींची नावे आहेत. यामधील अमोल कार्ले आणि आकाश चव्हाण कंपनीचे कर्मचारी असून आकाशने 2 महिन्यापूर्वी कंपनी सोडली होती.
ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित, आयुक्त परमवीर सिंग या पत्रकार परिषदेत हजर होते. चेकमेट कंपनीवर दरोडा टाकून 9 कोटी 16 लाखांची रक्कम लुटण्यात आली होती. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 4 कोटी 19 लाखांची रक्कम जप्त केली असून दरोड्यात वापरण्यात आलेल्या तीन झायलो गाड्याही जप्त केल्या आहेत.
या दरोड्यात एकूण 15 आरोपी सामील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी आठ पथकं महाराष्ट्र आणि राज्याबाहेर पाठवण्यात आले असून इतर आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे.
जास्त पैसे नेण्यासाठी साधणं नव्हती
ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्यावेळी कंपनीत 25 ते 30 कोटींची कॅश होती. मात्र साधनं उपलब्ध नसल्याने चोरट्यांनी केवळ 9 कोटींची रक्कमचं लुटली.
ठाण्यातील चेकमेट या कंपनीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील चोरटे पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. तपासासाठी वागळे इस्टेट पोलिसांसह गुन्हे शाखेची १० पथके राज्यासह परराज्यांतदेखील शोध घेत होती. गुन्हा घडल्यानंतर घटनेची माहिती एक तासाने पोलिसांना मिळाल्याने दरोडेखोरांना पलायन करण्यास वेळ मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या दरोड्यात कंपनीतीलच कुणी घरभेदी आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.
हा दरोडा पडत असताना कंपनीत दोघे सुरक्षारक्षक आणि १७ कर्मचारी कार्यरत होते. यातील पहिल्या गेटवर रामचंद्र कोरी, तर आतल्या बेसमेंटच्या गेटवर पवार हे सुरक्षारक्षक होते. पहिल्या गेटमधून माकडटोपी परिधान केलेले तिघे आणि रुमालाने तोंड झाकलेल्या एकाची छबी कंपनीतील स्क्रीनवर दिसल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी काहीच दक्षता कशी घेतली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच दरोड्यानंतर तब्बल एक तासाने पोलिसांना कळवल्याचे समोर आले होते. त्यामुळेच चोरट्यांना ठाणे शहराबाहेर पळून जाण्यास वाव मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.