मुंबई : अवकाळी पावसाने बुधवारी राज्यात सहा बळी घेतले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यालाही पावसाने तडाखा दिला, त्यात पिकांचे नुकसान झाले. पुणे, सांगली, सातारा, नाशिक, नगर, बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस झाला. लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्णाला बुधवारी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील म्हसला शिवारात दुपारी वीज पडून अंकुश भीमराव पतंगे हे ठार झाले. बीडमध्ये केज येथे शेख सुरय्या शेख आयुब (४५) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. उस्मानाबाद जिल्ह्णातील आंदोरा (ता. कळंब) तसेच सोनारी ( ता. परंडा) परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. आंदोऱ्यात वादळी वाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. कळंब रोडवरील नजीर पठाण यांची सहा एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त झाली. कळंब-बार्शी राज्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने राज्य मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती.नाशिकमधील कळवण तालुक्यातील भेंडी फाटा येथे वीज पडून वाजगाव येथील शेतमजूर पांडुरंग सुखदेव कुंवर यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खिरविरे शिवारात वीज पडून वाळीबा विठ्ठल साबळे (२८) या तरुणाचा मृत्यू झाला. साबळे यांचा दोन वर्षाचा मुलगा जखमी झाला. वाळीबा यांच्या पत्नीने भर पावसात अर्धा किलोमीटरवरील खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलाला नेले. तेथे त्यास योग्य उपचार मिळाले नाहीत. वाहन चालक नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही उपलब्ध होऊ शकली नाही. नंतर १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेतून वाळीबा व जखमी मुलास अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी सायंकाळी खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकले.मौजे उकळी येथे अंगावर वीज कोसळून दोन जण जखमी झाले. सातारा शहरासह वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सेवागिरी देवस्थानने येरळा पुलालगत नवीन बंधारा बांधला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अवकाळीचे सहा बळी!
By admin | Published: May 12, 2016 3:46 AM