पुणे : ससून रुग्णालयातून पलयान केल्याप्रकरणी संशयित आरोपी योगेश राऊतला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी ६ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. संगणक अभियंता नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात योगेश राऊत हा संशयित आरोपी आहे.पोलिस कस्टडीतून पळून गेल्याप्रकरणी २ वर्षे, बनावट नाव धारण केल्याप्रकरणी १ वर्ष, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी २ वर्षे व १ हजार रुपये दंड व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी १ वर्ष सक्तमजुरी सुनावली. न्यायालयाने सीआरपीसी ३१ नुसार या सर्व शिक्षा आरोपीने एका पाठोपाठ एक भोगावे असेही आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे राऊतला एकूण ६ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा झाली आहे. नयना पुजारी हिच्यावरील सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणी राऊतसह महेश ठाकूर, राजेश चौधरी, विश्वास कदम या चौघांना अटक झाली होती. चौघेही येरवडा कारागृहात होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात प्रलंबित असताना अंगाला खाज सुटत असल्याचा बहाणा करून योगेश ससून रुग्णालयात दाखल झाला. लघवी करायला जाण्याच्या बहाणा करून १७ सप्टेंबर २०११ रोजी त्याने रुग्णालयातून पलायन केले होते.च्राऊत हा दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी फरार होता. यामुळे सत्र न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होऊन न्यायालयाचा बहुमोल वेळ खर्च झाला. तसेच त्याच्या फरार असण्यामुळे बलात्कार व खून प्रकरणातील साक्षीदार दडपणाखाली होती. आरोपीच्या अटकेसाठी अनेक पोलिस पथके कार्यरत होती. च्पोलिस पथकाचा बहुमोल वेळ व अनेक मानवी तास आरोपीच्या शोधासाठी खर्च झाले आहेत, असे मत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी आदेश सुनावताना नोंदविले.
पलायनप्रकरणी राऊतला ६ वर्षांची सक्तमजुरी
By admin | Published: May 17, 2015 1:42 AM