मुंबई - मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळत नाही. शेतकऱ्याला दोन पैसे मिळालेले या सत्ताधाऱ्यांना पटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना यांच्याकडून श्रीमंतांची थकबाकी माफ केली जाते पण शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जात नाही, त्यामुळे मागील पाच वर्षात राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे गेवराई मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित आणि बीडचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या सभेला झालेल्या गर्दीवरून या दोन्ही मतदार संघात चमत्कार होणार, असं शरद पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या सर्व मित्रापक्षाकडून नव्या पिढीला नेतृत्व देण्याचे काम होत आहे. ५२ वर्षापूर्वी मी २७ वर्षाचा असताना यशवंतराव चव्हाण यांनी मला विधानसभेला उभे राहण्याची संधी दिली. त्यामुळे तरुणांना संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर देखील आहे. आज मी राज्यात फिरताना पाहतोय की लोकांमध्ये या सरकारविषयी नाराजी आहे. लोकांना बदल हवाय. लोकांच्या प्रश्नासाठी आणि लोकांसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. मात्र ते सांगायची तुमची लायकी नाही आणि सांगायला भांडवलही नाही. त्यामुळे विरोधकांवर तुम्ही आज खोटा खटला भरू शकता पण निकाल लागल्यावर तुमची जागा दाखवण्याचे काम तेव्हाचे सरकार करेल यात शंका नाही, असंही पवार म्हणाले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात शरद पवारांनी काय केलं. पण अमित शाहानाच पाच वर्षापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. राज्यात रोजगार हमी कायदा पहिल्यांदा आम्ही आणला, महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय आम्हीच घेतला हे सारे समजून घ्या, मग बोला. महाराष्ट्रासाठी आम्ही काय केलं हे विचारायचा अधिकार तुम्हाला नाही तो राज्याच्या जनतेला आहे.
आपल्या सत्तेचा गैरवापर करण्याचे काम आजचे सत्ताधारी करत आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री चिदंबरम सरकारविरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून महिन्याभरापूर्वी तुरुंगात घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या मदतीने विरोधकांचा आवाज बंद करण्यात येईल असा तुम्हाला वाटत असेल तर अशा शेकडो ईडीचं काय करायचं यासाठी आम्ही ताकदवान आहोत त्याची चिंता तुम्ही करू नका असा इशाराही पवारांनी दिला.