लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वस्तू आणि सेवाकर १ जुलैपासून लागू होत आहे. तत्पूर्वी शिल्लक असलेल्या मालासाठी सध्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर छप्परफाड आॅफर्सचा वर्षाव होत आहे. हा माल खपवण्यासाठी विविध दुकानदार सुमारे ५० ते ७० टक्के सूट देत आहेत. शहरातील सर्वच इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये तसेच बॅ्रण्डेड वस्तूंच्या दुकानांमध्ये आणि शॉपिंग साईट्सवर माल खपवण्यासाठी सध्या तुफान आॅफर्स दिल्या जात आहेत. ग्राहकदेखील या संधीचा फायदा घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी दिलेल्या आॅफरचा ज्यांना फायदा घेणे शक्य आहे, त्यांनी तो जरूर घ्यावा, असे अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.सीए प्रफुल्ल छाजेड यासंदर्भात म्हणाले की, जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानंतर वस्तूंच्या सध्याच्या किंमती आणि नवे दर लागू झाल्यानंतरच्या किमतींचा विक्रेत्यांना ताळमेळ साधणे कठीण होणार आहे. ही परिस्थिती जीएसटी लागू झाल्यानंतर साधारण एक महिना तशीच राहण्याची शक्यता आहे. एक महिन्यानंतर परिस्थिती स्थिर होईल. परंतु जीएसटी लागू होईपर्यंत साठवून ठेवलेला माल खपवण्यावर विक्रेत्यांचा भर राहील. माल खपवला जावा म्हणून विक्रेते मालावर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. अशा परिस्थितीचा ग्राहकांनी फायदा घ्यायला हवा. दादरच्या कोहिनूर टेलिव्हिडीओचे शाखा व्यवस्थापक अविनाश शाह म्हणाले की, सूट दिल्यापासून ग्राहकांची संख्या ५० ते ६० टक्के वाढली आहे. स्टॉक असेपर्यंत अथवा ३० जूनपर्यंत या आॅफर सुरू राहणार आहेत. ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ५० किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांची सूट दिली होती, त्या वस्तू आॅफर दिल्यानंतर सात दिवसांच्या आत संपल्या. अन्य आॅफर अजूनही सुरू आहेत. ‘ब्लॅक मनीचा ब्लॅक स्टॉक’-मोठमोठी दुकाने आणि त्यांच्या गोदामांमध्ये ज्या साहित्यावरील कर भरलेला आहे, असा माल मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तो माल सगळे विक्रेते खपवण्यासाठी कमालीचे आतुर झालेले आहेत. यानंतरच्या सर्व खरेदी-विक्रीबाबतच्या माहितीची नोंद ठेवावी लागणार आहे. काही लोकांनी त्यांच्याकडील काळा पैसा महागड्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्यामध्ये गुंतवला होता. त्यामुळे ‘ब्लॅक मनी’चा वापर करून खरेदी केलेला ‘ब्लॅक स्टॉक’ अनेकांच्या दुकानांमध्ये पडून आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी तो संपवण्यावर विक्रेत्यांचा भर आहे. आधीचा स्टॉक आढळून आल्यास मालाच्या १०० टक्के किंवा ८० टक्के कर लागेल याची भीती विक्रेत्यांमध्ये आहे. परंतु ग्राहकांनी या संधीचा फायदा उचलायला हवा आणि कमी दरामधील वस्तू घ्यायला हव्यात. - रमेश प्रभू, सीए
जीएसटीपूर्वी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर छप्परफाड आॅफर्स
By admin | Published: June 29, 2017 3:14 AM