नाशिक : महापालिका निवडणुकीत महिलावर्गाने मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. यंदा ६०.५४ टक्के महिलांनी मतदान करत लोकशाहीच्या बळकटीकरणाला हात दिला, तर ६२.५२ टक्के पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. महापालिका निवडणुकीसाठी यंदा १० लाख ७३ हजार ४०७ मतदार होते. त्यात पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ७० हजार ६९९, तर स्त्री मतदारांची संख्या ५ लाख २ हजार ६३७ इतकी होती. निवडणुकीत एकूण ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३ लाख ५६ हजार ८५५ पुरुष, तर ३ लाख ४ हजार ३४१ स्त्री मतदारांचा समावेश होता. एकूण मतांची टक्केवारी ६१.६० टक्के राहिली. मतदानासाठी महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
६०.५४ टक्के महिलांनी घराबाहेर पडत राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यंदा मतदान करणाऱ्या मतदारांच्या संख्येत तब्बल ८७ हजार ६१८ मतदारांची भर पडली. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत १० लाख ३ हजार मतदारांपैकी ५ लाख ७३ हजार ५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा १० लाख ७३ हजार ४८७ मतदारांपैकी तब्बल ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी मतदान केले. यंदा ७० हजार नवमतदारांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती. मतदानाच्या दिवशी नवमतदारांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.
त्यामुळे मतांचा टक्का वाढण्यास मदत झाली. इन्फो तीनच तृतीयपंथीयांचे मतदान महापालिका निवडणुकीसाठी ७२ तृतीयपंथी मतदार होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघात ५० तृतीयपंथी मतदार होते. परंतु त्यातील केवळ दोहोंनीच मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा प्रथमच महापालिका निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या तृतीयपंथीयांचा लक्षणीय सहभाग असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ७२ पैकी केवळ तीनच तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये प्रभाग ९, प्रभाग १० आणि प्रभाग २७ मधील प्रत्येकी एक तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.