रवींद्र देशमुखमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. बालेकिल्ल्यात बसलेल्या या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहे. उदयनराजे यांना शह देण्यासाठी पवारांनी खास मित्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. पाटील देखील या प्रतिष्ठेच्या लढाईत पवारांसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत.
शरद पवार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मैत्री 60 वर्षांपासून आहे. श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत होते. परंतु, 1999 मध्ये पवारांनी पाटील यांना मुंबईला बोलवून राजीनामा देण्यास सांगितले. मी जेव्हा सांगेल तेव्हा राजीनामा द्यायचा असा शब्दच पवारांनी पाटील यांच्याकडून प्रशासकीय सेवेते जाण्यापूर्वी घेतला होता. त्यानुसार पाटील यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर पवारांनी पाटील यांना जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्यास सांगितले. पाटील यांनी तसंच केलं आणि कराडमधून ते तब्बल साडेतीन लाख मतांनी निवडून आले होते. विशेष म्हणजे पवार आणि पाटील यांनी कॉलेज जीवनातच राजकारणात जाण्याचे ठरवले होते.
प्रशासकीय सेवेनंतर पाटील दोन वेळा कराडचे खासदार होते. तसेच त्यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले होते. आता साताऱ्यातून उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार हवा म्हणून राष्ट्रवादीतून पाटील यांचे नाव समोर आले. पाटील यांनी सुरुवातीला उमेदवारीसाठी नकार दिला होता. त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील इच्छूक होते. तशी तयारीही त्यांनी सुरू केली होती. पण उदयनराजे यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटीलच योग्य असल्याचे पवारांना वाटते.
मुळात श्रीनिवास पाटील निवडणूक लढविण्यास उत्सुक नव्हते. परंतु, उदयनराजेंनी पवारांसोबत केलेल्या दगाफटक्याचा बदला घेण्यासाठी पाटील तयार झाल्याचे समजते. श्रीनिवास पाटील 60 वर्षांपासून शरद पवारांसोबत आहेत. त्यांची मैत्रीही सर्वश्रूत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या माळेतील एक-एक मणी गळून पडत असताना बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी मित्र पुन्हा धावून आल्याची चर्चा साताऱ्यात रंगली आहे.
एकूणच माजी राज्यपाल आणि उदयनराजे यांच्यातील साताऱ्याची लढत रंगतदार होणार आहे. आता उदनयराजे भाजपमध्ये जावूनही आपला करिश्मा कायम राखतात, की शरद पवारांच्या चाणाक्ष चालींसमोर हतबल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी सातारा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचे मतदान होणार आहे.