लक्ष्मण मोरे पुणे : जगातील सर्वात भव्य स्मारक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सरदार सरोवरावरील स्मारकाचे येत्या ३१ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पुण्यामध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या आस्था, अनुभव आणि विचारमंथनामधून प्रगटलेली एक संकल्पना मूर्त स्वरुपात उतरली आहे. प्रभाकर एम. कोल्हटकर असे या ८८ वर्षांच्या ध्येयवेड्या ज्येष्ठाचे नाव असून त्यांनी या स्मारकाचे संकल्पनाचित्र व डिझाईन तयार केले आहे. प्रभाकर कोल्हटकर यांचे वडील स्वातंत्र्यपूर्व काळापासून नामवंत शिल्पकार होते. त्यांचे कुटुंब मूळचे गुजरातमधील बडोद्याचे. त्यामुळे कोल्हटकरांच्या वडिलांचा सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधींकडे विशेष ओढा होता. त्यातही पटेलांशी त्यांचा संपर्क असे. यामधूनच प्रभाकर कोल्हटकरांवर पटेलांचा प्रभाव पडला. ते स्वत: आर्किटेक्ट असून नगररचनाकार म्हणून अनेक वर्षे शासकीय नोकरीमध्ये होते. निवृत्तीनंतर त्यांनी दहा वर्षांचा काळ बडोद्यात व्यतित केला. त्यानंतर ते पुन्हा पुण्यामध्ये राहण्यास आले. यादरम्यानच्या काळात त्यांनी चित्रकला शिकण्यास सुरुवात केली. वेगळे काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सरोवराचे काम पूर्ण होत आल्याचे त्यांना समजले. अथांग जलाशयाला आणि अथांग अशा अवकाशाला व्यापून राहील, असे स्मारक असावे, अशी कल्पना त्यांना सुचली. तेथे अभ्यासू, जिज्ञासू यावेत, पटेलांचा जीवनपट माहिती पडावा, पर्यटन वाढावे, असे अनेक उद्देशही या संकल्पनेमध्ये होते. त्यांंनी इंटरनेटची मदत घ्यायला सुरुवात केली. नातवंडे, जावई आणि मुलांकडून आॅनलाईन माहिती मिळविण्यासाठी मदत घेतली. सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली. पटेलांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशा स्मारकासाठी विचारमंथन सुरू झाले. पटेलांबद्दलच्या आस्थेची एक भावनिक किनारही त्याला होती. परिवाराने त्यांना कायमच या कामात प्रोत्साहन दिले. या स्मारकामध्ये नेमके काय काय असावे, पुतळ्याच्या आतमध्ये इमारत असावी, स्मारकापर्यंत जाण्यासाठीच्या सोयी आदींनी परिपूर्ण असा एक ‘प्रोजेक्ट’च बघता बघता तयार झाला. कुटुंबीयांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा संपूर्ण अहवाल सहा वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना ई-मेलद्वारे पाठविला. एक आठवड्याच्या आतमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना भेटीसंदर्भात विचारणा झाली. ते जावई डॉ. विभास यांना सोबत घेऊन मोदींना भेटायला गेले. त्यांच्यासाठी १५ मिनिटांची वेळ राखून ठेवलेली होती. प्रत्यक्षात मात्र ही बैठक ४२ मिनिटे चालली. बैठक सुरू झाल्यानंतर ८ व्या मिनिटाला त्यांनी स्मारकाबाबत निर्णय घेतला. मोदींनी ‘हे स्मारक होईल आणि इथेच होईल,’ असा शब्द दिला. बैठक संपल्यानंतर त्यांनी या स्मारकाला ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ हे नाव दिल्याचे सांगताच मोदींनी त्यांना हेच नाव कायम राहील, असा शब्द दिला. त्यानंतर त्यांच्या अधिकारी आणि मोदींसोबत स्मारकाबाबत एकूण आठ वेळा बैठका झाल्या. त्यातील पहिली आणि शेवटची बैठक फक्त मोदींसोबत झाली. कोणत्याही स्वरुपाचे मानधन न घेता हे केवळ देशभक्तीच्या भावनेने आपण काम केल्याचे त्यांनी सांगितले. .................अशा प्रकारचा अद्भुत अभियांत्रिकी नमुना मानवी इतिहासात कधीही तयार करण्यात आलेला नाही. हा पुतळा लोहापासून तयार होणार असून त्यावर पितळेचे आवरण असणार आहे. २० हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रामध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर हे स्मारक होत आहे. तेथपर्यंत जाण्यासाठी पूल तयार करण्यात आला आहे. यासोबतच प्रेक्षक गॅलरीसह अभ्यास केंद्रही असणार आहे. पुतळ्याच्या आतमध्ये ६० मजली इमारत होणार आहे. ..................मला वाटले सरदार पटेलांचे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे स्मारक व्हावे. त्यांच्या कर्तबगारीची जगाला ओळख व्हावी. मी स्केचबोर्डवर संकल्पना उतरवली. ती तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना ई-मेल केली. त्यांनी प्रकल्प होणारच, असा शब्द दिला. दोनच वर्षांत मोदी देशाचे पंतप्रधान झाले. मात्र, हा प्रकल्प थांबला नाही. सहा वर्षांनंतर हे स्मारक प्रत्यक्ष साकारत आहे. एखादी संकल्पना अगदी सहज कागदावर उतरावी अन् त्याचे मूर्त स्वरुप जगातील सर्वात मोठ्या स्मारकामध्ये व्हावे, यासारखा कर्मपूर्तीचा आनंद असू शकत नाही. हे जगातील सर्वात उंच स्मारक असून तब्बल १८२ मीटर उंच आहे. अमेरिकेच्या स्टॅच्यू आॅफ लिबर्टीपेक्षा दुप्पट, ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओपेक्षा पाचपट, सरदार सरोवरापेक्षा दीडपट असणार आहे. - प्रभाकर कोल्हटकर, पुणे
‘स्केच’ बोर्ड ते ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 6:00 AM
पुण्यामध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या आस्था, अनुभव आणि विचारमंथनामधून प्रगटलेली एक संकल्पना ३१ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्त स्वरुपात उतरत आहे.
ठळक मुद्देप्रभाकर कोल्हटकर यांचे वडील स्वातंत्र्यपूर्व काळापासून नामवंत शिल्पकार ते स्वत: आर्किटेक्ट असून नगररचनाकार म्हणून अनेक वर्षे शासकीय नोकरीमध्ये पुतळा लोहापासून तयार होणार असून त्यावर पितळेचे आवरण असणार जगातील सर्वात उंच स्मारक असून तब्बल १८२ मीटर उंच