अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत ८ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे. या शपथविधीला राष्ट्रवादीचे तीन खासदार उपस्थित होते. यापैकी दोन खासदारांवर कारवाईचा प्रस्ताव पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे केली आहे.
राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे समजते आहे.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली आहे. तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्यासमोर दाखल करावी, असा प्रस्ताव सुळे यांनी शरद पवारांकडे मांडला आहे.
या शपथविधीला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे देखील होते. त्यापूर्वी ते अजित पवारांच्या बंगल्यावर देखील होते. आपण वेगळ्या कामासाठी गेलेलो, तेव्हा आपल्याला कल्पना नव्हती, असा खुलासा कोल्हे यांनी केला आहे. तसेच तेव्हा आपण सुप्रिया सुळे यांनादेखील भेटल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. आज त्यांनी अजित पवारांचा निर्णय आपल्याला पटला नसल्याचा खुलासा केला आहे. मी शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या भुमिका साकारतो. यामुळे असे करणे योग्य नसल्याचा विचार मी केला आहे. यामुळेच मी माझी भूमिका आज मांडली आहे, असे कोल्हे म्हणाले आहेत.
कोल्हे परत आल्याने सुप्रिया सुळेंनी कोल्हेंवरील कारवाई रद्द केल्याची चर्चा सुरु झाली आहे. पटेल, तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शरद पवारांनी काल दिला होता. ५ जुलैला पवारांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, त्यानंतर कोणावर कारवाई करायची कोणावर नाही हे स्पष्ट होणार आहे.