विश्वास पाटील , कोल्हापूरचांगले करिअर असतानाही राजकारणाची झिंग काय अनेकांना गप्प बसू देत नाही, याचेच प्रत्यंतर कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत येत आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून प्रियांका संपतराव पाटील या रिंगणात आहेत. दिल्लीत भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी गेली अडीच वर्षे त्या अभ्यास करत होत्या, परंतु मतदारसंघ महिलेसाठी आरक्षित झाल्यावर त्या ‘यूपीएससी’चे करिअर सोडून झेडपीच्या मैदानात उतरल्या आहेत.पन्हाळा तालुक्यातील काकडी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले आसुर्ले हे गाव. त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. आजोबा शंकरराव दौलतराव पाटील हे तत्कालीन दत्त साखर कारखान्याचे (आता खासगीकरण होऊन दालमिया गु्रपच्या मालकीचा) अध्यक्ष होते. चुलते बाबासाहेब पाटील हेदेखील या कारखान्याचे अध्यक्ष होते. सध्या ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व जिल्हा बँकेचे संचालक आहेत. या मतदारसंघातून ते स्वत:च इच्छुक होते, परंतु आरक्षण जाहीर झाल्यावर त्यांनी सुशिक्षित उमेदवार म्हणून पुतणीला दिल्लीहून बोलावून घेऊन मैदानात उतरविले आहे.प्रियांका शास्त्र शाखेची पदवीधर आहे. ती यूपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाली आहे. या निवडणुकीकडे सामाजिक काम करण्याची संधी म्हणून आपण पाहते आणि निवडून आल्यावर मतदारसंघात विकासाचे मॉडेल विकसित करणार असल्याचे ती सांगते. आता प्रचाराचा धुरळा तिने उडवून दिला आहे. प्रचारसभांमधून तडाखेबंद भाषणे देत ती फिरत आहे.कागल तालुक्यांतून सिद्धनेर्ली मतदारसंघातून आशियाई सुवर्णपदक विजेता रवींद्र पाटील यांनी पत्नी वृषाली यांना रिंगणात उतरविले आहे. बानगे हे कुस्तीसाठी व सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले गाव. तो गावातील जयभवानी तालीम व पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत कुस्ती खेळला. ‘रूस्तम-ए-हिंद’ हरिश्चंद्र बिराजदार व भाऊसाहेब चव्हाण हे त्याचे कुस्तीतील गुरू. ‘उपमहाराष्ट्र केसरी’ झाल्यावर त्याला राज्य शासनाकडून ‘शिवछत्रपती पुरस्कार’ मिळाला व लगेचच रेल्वेमध्ये नोकरीही मिळाली. गेली आठ वर्षे तो पुण्यात सीनिअर तिकीट निरीक्षकाची नोकरी करतो, परंतु त्याला ती नोकरी सोडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची होती, परंतु सेवेतील काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला ते शक्य झाले नाही. त्यामुळे स्वत: नाही, म्हणून पत्नीला रिंगणात उतरविले आहे.
‘करिअर’ सोडून झेडपीच्या मैदानात
By admin | Published: February 09, 2017 12:34 AM