ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 - अंगाला झोंबणारा गार बोचरा वारा, पहाटेपासूनच रंगबेरंगी पतंगांनी भरलेले आकाश आणि प्रतिस्पर्धीची पतंग कापल्यानंतर होणारा जल्लोष असे चित्र शनिवारी दिवसभर नंदुरबारच्या विविध भागात दिसून येत होते. निमित्त होते मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित पतंग उत्सवाचे.
नंदुरबारात मकरसंक्रातीनिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव साजरा केला जातो. यंदा अधीक उत्साह दिसून आला. पतंग उडविण्यासाठी असलेल्या हवेचा वेग पहाटेपासूनच असल्यामुळे पतंग उडविणाऱ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. एकीकडे दिवसभर गारठा आणि त्यातच थंड बोचरे वारे अशातच जास्तीत जास्त उंच पतंग उडविण्यासाठी होणारी रस्सीखेच आणि प्रतिस्पर्धीची पतंग कापण्यासाठी झालेली चढाओढ पहाण्यासारखी राहत होती. पहाटेपासून सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होता. रात्रीच्या अंधारात दिव्यांचे पतंग देखील आकाशात लक्ष वेधून घेत होते.
पतंगत्सोवाची रंगत भल्या पहाटेपासूनच सुरू झाली होती. डीजे, ढोल-ताशांचा निनादात पहाटेपासून पतंग उडविले जात होते. घरांच्या गच्चीवर लावण्यात आलेले डीजे व ढोल-ताशे यामुळे कुणाकडे कोणते गाणे सुरू आहे तेच समजून येत नव्हते. त्यामुळे ध्वनी प्रदुषणाचा आज कहरच झाला होता. पतंगोत्सवात आकंठ बुडालेल्यांनी त्याकडे कानाडोळा केला.