आकाश गायकवाड,
डोंबिवली- कल्याण-डोंबिवलीत स्टेशन परिसरातील गर्दी कमी व्हावी आणि पादचाऱ्यांची सोय व्हावी म्हणून कोट्यवधी रूपये खर्चून बांधलेल्या स्कायवॉकच्या सुरक्षेकडे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने तेथे प्रेमीयुगुलांचे चाळे वाढले आहेत. त्यातच सायंकाळनंतर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने आणि कॅमेरे नसल्याने अवैध धंदा करणाऱ्यांचे फावत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील रेल्वेपुलाला जोडून स्कायवॉक बांधण्यात आले. त्यातून स्टेशन परिसरातील गर्दी कमी व्हावी हा हेतू होता. मात्र फेरीवाले, अवैध विक्रेते यांनीच त्यांचा ताबा घेतला. शहर पोलीस, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल यांच्या हद्दीच्या वादात फेरीवाल्यांवर फारशी कारवाई होत नसल्याने त्यांनी तेथील मोक्याच्या जागा बळकावल्या आहेत. त्या जागेच्या मालकीवरून फेरीवाल्यांत मारामाऱ्याही हत आहोत. या स्कायवॉकसाठी पालिका, एमएमआरडीएक, रेल्वे यांनी कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. कल्याणच्या स्कायवॉकवर आधीच शेड होती. मात्र डोंबिवलीत फेब्रिक शेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यातून प्रवाशांची सोय होण्याऐवजी फेरीवाले, प्रेमी युगुले, अवैध धंदा करणाऱ्यांना आसरा मिळाला. त्यांची सोय झाल्याचे या स्कायवॉकवर फिरताना जाणवतो. फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने त्यांच्या मालाच्या ने-आणीत लाद्या तुटल्या आहेत. कठडे मोडले आहेत. शिवाय त्यांच्या मालामुळे पुलावर, पुलाखाली, रेल्वे मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरते आहे. भटकी कुत्री, मोकाट जनावरे, गर्दुल्ले, भिकारी यांचाही तेथे मुक्त संचार असतो. दुपारी आणि रात्रीची गर्दीची वेळ टळताच स्कायवॉकवर शुकशुकाट असल्याने त्याचा फायदा घेऊन अनेक तरु ण-तरु णींचा प्रणय रंगात आल्याचे दिसून येते. ज्या भागात अजून शेड टाकलेली नाही तेथे पावसाचा फायदा गेत छत्रीच्या आडोशाने चाळे सुरू असतात. त्यामुळे स्कायवॉकवरून जाणाऱ्यांना मान खाली करून प्रवास करावा लागतो. कल्याण-डोंबिवलीतील उद्याने, खाडीकिनारे, या प्रेमीयुगलांनी आधीच हाऊसफुल्ल असताना आता त्यांनी स्कायवॉकचाही आधार घेतल्याचे दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी चाळे सुरू असूनही पोलीस मात्र त्यावर कारवाई करताना दिसत नाहीत. >वारांगनांचाही वावरपावसामुळे आणि रस्त्यावरील गर्दी कमी असल्याने वारांगना आणि अवैध धंदे करणाऱ्यांनाही मोकळे रान मिळाले आहे. त्यांच्यामुळे अन्य महिलांनाही आंबटशौकीन प्रवाशांचा त्रास होतो.त्यामुळे किमान रात्रीच्या वेळी स्कायवॉकवर सुरक्षा ठेवावी, अशी महिला प्रवाशांची मागणी आहे.