वज्रेश्वरी : भिवंडीत रविवारी महादेव इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी कल्याण रोडवरील एका इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाले.कल्याण रोडवरील प्रभाग क्र मांक-२ येथील नवी वस्तीतील मुख्तार अन्सारी यांच्या मालकीची ३० वर्षे जुनी ‘मंजिल’ ही चार मजली इमारत आहे. महापालिकेने ती अतिधोकादायक म्हणून घोषित केली होती. या इमारतीत ८५ कुटुंबे राहत होती. त्यापैकी ८२ कुटुंबांनी जुलैमध्ये या खोल्या पूर्णपणे रिकाम्या केल्या होत्या. मात्र, तीन कुटुंबांनी आपले सामान खोल्यांमध्ये ठेवले होते. यातील पहिल्या मजल्यावरील रहिवासी खिजर खान, पत्नी तंजिला व मेहुणा सिकंदर हे सोमवारी खोलीवर आले होते. त्या वेळी अचानक खोलीतील स्लॅबखाली तळ मजल्यावर कोसळला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. त्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, सलग दोन रविवारी झालेल्या दुर्घटनांत एकूण १६ जणांचा बळी गेले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ही इमारत आज पाडण्यात येणार होती. स्लॅब कोसळल्यानंतर इमारत पाडण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. (वार्ताहर)
अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जखमी
By admin | Published: October 08, 2016 5:12 AM