मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात दक्षिण आफ्रिकन संस्थांनी पुढाकार घेतल्यास, आफ्रिकन कंपन्या, संस्थांना आवश्यक परवाने तातडीने उपलब्ध करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिली. दक्षिण अफ्रिकेच्या प्रीमियर आॅफ वेस्टर्न केप प्रोव्हीन्सेसच्या हेलन झिले यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची बुधवारी वर्षा निवासस्थानी भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे निर्माण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. राज्यापुढे विशेषत: मुंबईत झोपडपट्ट्यांची मोठी समस्या आहे. या झोपडपट्टी भागात परवडणारी घरे बांधण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेतल्यास, शासन संपूर्ण सहकार्य करेल, तसेच राज्याच्या विकासात्मक कामांसाठी कंपन्यांना व संस्थांना लागणारे विविध आवश्यक परवाने तातडीने उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले.महाराष्ट्रात औषध निर्माण कंपन्यांच्या साहाय्याने विशिष्ट आजारांवर संशोधन करून औषधांची निर्मिती केली जाते. त्याच पद्धतीने द.आफ्रिकेतही मुंबईतील औषध उत्पादन कंपन्यांनी संशोधनात्मक औषध निर्मितीसाठी पुढाकार घेत गुंतवणूक करावी, असे आवाहन हेलन झिले यांनी केले असता, याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी हेलन झिले यांनी केपटाऊन येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०१७’चे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांना दिले.
‘झोपु’साठी द. आफ्रिकन संस्थांना सहकार्य
By admin | Published: November 19, 2015 2:27 AM