मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्याचा समावेश असून, १९ फेब्रुवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईचे किमान आणि कमाल तापमान स्थिर आहे. हवामानात किंचित गारवा आहे. परिणामी मुंबईत थंडी आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि लगतच्या भागावरील चक्रवात आता दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर आहे.
- उत्तर कर्नाटक ते विदर्भावर असलेला चक्रीय चक्रवातापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा आता केरळ किनारपट्टी-कर्नाटक-दक्षिण मध्य महाराष्ट्रावर आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.