मुंबई : ब्रिटिश काळापासून वापरात असलेल्या मस्केट रायफल इतिहासजमा करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मदतीने मुंबई पोलिसांनी घेतला आहे. या मस्केट रायफलच्या जागी अत्याधुनिक एसएलआरने घेतली आहे. मुंबई पोलिसांकडे ३०३ आणि ४१० बोअरच्या मस्केट रायफल होत्या. ब्रिटिश काळापासून मुंबई पोलीस याचा वापर करत होते. आधीच्या रायफल्सची रेंज ३०० ते ३५०च्या आसपास होती. मात्र प्रत्येक फायरिंग दरम्यान या रायफल्समध्ये बुलेट लोड करावी लागे. अशा वेळी या बंदुकीला दोन चाप असल्याने ते जाम होत असत. बंदुकीचा चाप जाम होत असल्याने रायफल असूनही नसल्यात जमा होती. २६ नोव्हेंबर २००८मध्ये मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीसांनी ३०३ आणि ४१० बोअरच्या मस्केट रायफलनेच दहशतवाद्यांशी दोन हात केले. या हल्ल्यानंतर नेमलेल्या राम प्रधान समितीने पोलिसांकडील असलेल्या रायफल या निकामी आणि कुचकामी असल्याने त्या जागी अत्याधुनिक बंदुका दिल्या पाहिजेत, असे अहवालात नमूद केले. या अहवालानंतर राज्य सरकारने २००९पासून ३०३ आणि ४१० बोअरची मस्केट रायफल जमा करण्यास सुरुवात केली. त्या जागी एसएलआर रायफल देण्यास सुरुवात झाली होती. अखेर ४५ हजार पोलीस दलाला एसएलआर रायफल देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
मुंबई पोलिसांकडे दुनळी बंदुकीऐवजी एसएलआर रायफल
By admin | Published: March 16, 2016 8:37 AM