पंकज रोडेकर ठाणे : लहान भावासह आइस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या सख्ख्या बहिणी दिल्लीतील प्रियकराला भेटण्यासाठी अचानक गायब झाल्या, पण गणेशोत्सवाच्या धामधुमीतही ठाणेनगर पोलिसांनी त्यांना शोधून काढले.या प्रकरणी विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या लम्बू ऊर्फ अजिज अब्दुल हमीद शेख याला अटक केली असून त्याने त्या दोघींपैकी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले.महागिरीत राहणा-या १९ आणि १४ वर्षीय बहिणी लहान भावासह आइस्क्रीमच्या बहाण्याने गेल्या. तो दुकानात गेल्यावर त्या गायब झाल्या. तीन दिवस झाले, तरी मुली घरी येत नसल्याने पालकांनी २४ आॅगस्टला तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास पथक तयार करून शोधकार्य सुरू केले. कुटुंबीयांची चौकशी केली, त्यात हे कुटुंब कोलकाता येथून ठाण्यात आल्याचे व तीन महिन्यांपूर्वी दिल्लीला गेल्याचे समजले. तेथील मुख्य मार्केट येथे राहणाºया लम्बूचे मुलीला सतत फोन येत होते, असे लहान भावाने सांगितल्याने त्या आधारे तपासाला सुरुवात झाली. फोन नंबरच्या आधारे त्याचे लोकेशन शोधले आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्या आणखी एका नंबरबाबत विचारणा केल्यावर त्याने तो नंबर पत्नीचा असल्याचे सांगितले. पण तोच नंबर त्या मुलीकडे असल्याचे समोर आले. फोन केल्यावर तिने दादरला असल्याचे सांगितले. पण संशय आल्याने लोकेशन तपासल्यावर ती दिल्लीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन्ही मुलींची पोलिसांनी सुटका केली आणि लम्बूला अटक केली. त्यानेच तिला भेटण्यासाठी दिल्लीत बोलावल्याचेही उघड झाले.
लहान भावासह आइस्क्रीमसाठी बाहेर पडल्या आणि प्रियकराला भेटण्यासाठी त्या पोहोचल्या दिल्लीत, ठाणे पोलिसांच्या तत्परतेने दोन्ही बहिणी घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 8:02 AM