लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या लहान घटकपक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत ४०च्या आसपास जागा हव्या आहेत. यात डाव्या पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षाचा समावेश आहे.
जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना बुधवारी ‘मविआ’च्या प्रमुख नेत्यांनी डाव्या पक्ष आणि समाजवादी पक्षासोबत चर्चा केली. शेकापचे नेते जयंत पाटील मुंबईबाहेर असल्याने या बैठकीला नव्हते. ते उद्या मविआच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. घटकपक्षांकडून आलेल्या प्रस्तावावर येत्या ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा होणार आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ११, समाजवादी पक्षाने १२, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष आणि इतर लहान-मोठे पक्ष, संघटनांनी मिळून जवळपास ४०च्या आसपास जागा ‘मविआ’कडे मागितल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत लहान घटकपक्षांमुळे जिथे ‘मविआ’ला यश मिळाले त्या जागा मिळाव्यात आणि जागावाटप सन्मानजनक व्हावे, अशी या घटकपक्षांची भूमिका आहे.
‘मविआ’सोबतची चर्चा सकारात्मक झाली. चर्चेतून मार्ग निघेल. ही निवडणूकपूर्व आघाडी आहे. आम्ही दिलेल्या प्रस्तावावर ‘मविआ’चे नेते विचार करतील, अशी अपेक्षा आहे. - उदय नारकर, राज्य सचिव, माकप
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडीसोबत जागावाटपावरून चर्चा बिनसल्यामुळे सपाला ३ जागाच लढवता आल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत ‘मविआ’सोबत जाण्याची इच्छा असून, १२ जागा‘मविआ’ने सपासाठी सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. - अबू आझमी, नेते, समाजवादी पार्टी
कुणी कोणत्यामागितल्या जागा nसपा : भायखळा, वर्सोवा, अणुशक्तीनगर, मानखुर्द, भिवंडी पूर्व आणि पश्चिम, मालेगाव मध्य, धुळे शहर, औरंगाबाद मध्य nमाकप : डहाणू, कळवण, सोलापूर मध्य, नाशिक पश्चिम, अकोले, किनवट, माजलगाव, पाथरी, दिंडोरी, इगतपुरी, विक्रमगड, शहापूरnभाकप : वणी, हिंगणा, शेवगाव पाथर्डी, शिरपूर, औरंगाबाद मध्य, दारव्हा, भिवंडी पूर्व, शहापूर, सायन कोळीवाडा, नाशिक, भंडारा.