ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० - देशभरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मान पुणे शहराला मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यासह 98 स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उदघाटन येत्या 25 जून 2016 रोजी होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण शहरात 15 ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे करण्यात येणार आहे.
त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून या प्रक्षेपणाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी दिल्या. पंतप्रधान मोदी यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणामध्ये समन्वय असावा यासाठी राव यांनी सर्व संबधित विभागांची बैठक घेतली. याता सुरक्षेबाबत विशेष उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह पुणे शहर पोलीस, पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विमानतळ प्राधिकरण, एअर इंडिया, महावितरण, बीएसएनएल या विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्यासह 98 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे होणार आहे. या सर्व शहरांच्या प्रकल्पांचे ऑनलाईनरित्या उद्घाटन ते करणार आहेत. यावेळी ही सर्व शहरे संगणकाद्वारे ऑनलाईन जोडलेली असणार आहेत. शिवाय काही स्मार्ट सिटीच्या पदाधिकारी, अधिका-यांसमवेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधनार आहेत.
यावेळी बीएसएनएल, एनआयसी, सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व तांत्रिक पूतर्ता करुन अखंड ऑनलाईन संवादाची व्यवस्था राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या शिवाय, पोलीस विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवावा. पंतप्रधानांच्या आगमनापासून प्रयाणापर्यंत सर्व ठिकाणी जबाबदार अधिका-यांची नेमणूक करण़्यात यावी, सुरक्षा पासेस देताना सर्व ती माहिती तपासून पासेस द्यावेत. पुणे महानगरपालिकेने पंतप्रधान यांच्या विमानतळ ते बालेवाडी तसेच अन्य प्रवासाचे रस्ते तातडीने दुरुस्त करुन घ्यावेत, या रस्त्यावर असलेले सर्व वेगनियंत्रक काढावेत, सांडपाणी रस्त्यावर येणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही राव यांनी यावेळी दिल्या.