ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 25 - स्मार्ट सिटी योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे निवडण्यात आलेली असली तरी उर्वरीत आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ते बोलत होते. या शहरांसाठी आर्थिक मदत देण्यास जगभरातील अनेक देश उत्सुक आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने मदत करावी असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले.
फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत. यासोबतच समाजाच्या सर्व स्तरांना आणि विशेषत: गरीबांना स्थान मिळतेय. आजवर श्रीमंतांना सेवा मिळत आली आहे. मात्र, आता सर्वसामान्य आणि गरिबांनाही सेवा मिळणार आहे. त्यांचा विकास होईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. शहरात इंफ्रास्ट्रकचर तयार करणारा कार्यक्रम नाही तर ट्रान्सफॉर्म करणारा कार्यक्रम, तरुणांना रोजगार मिळणार. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी पुण्याला निवडले त्यासाठी आभारी आहे. जगातल्या स्मार्ट लोकांमध्ये पुण्यातल्या लोकांचा समावेश आहे. गेल्या 50 वर्षांपासून शहरीकरणाला शाप मानून आपण चाललो. ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणावर शहराकडे लोक आले आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करु लागले. शहरीकरणाला आपण संधी मानत स्मार्ट सिटीसारखी नवी संकल्पना कार्यान्वित केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक महापालिकेत पंतप्रधान मोदी यांचे लाइव भाषण ऐकन्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महापौर यांचेसह केवळ चार नगरसेवक उपस्थित होते. मनपा कर्मचारी मात्र आदेशामुळे हजर होते.
पुण्यात स्मार्ट सिटीचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण : वैंकय्या नायडू
पुणे : पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामधून स्मार्ट सिटीचे होत असलेले उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण आहे. आपण एक देश आहोत. ही टीम इंडिया आहे. एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही असे मत केंद्रिय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
स्मार्ट म्हणजे सुटबुट,हॅट नव्हे, तर सर्वसामान्याचे जीवन सुसह्य बनवणे आहे. शहरातील जीवनमान सुधारणे म्हणजे स्मार्ट सिटी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे सांगणा-या लोकमान्य टिळकांपासून, स्वा. सावरकर, महात्मा फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, संत तुकाराम, पंढरपुर सर्वांचे मुख्य केंद्र पुणे राहीले आहे. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन काम करावे, प्रत्येकाने योगदान द्यावे. ‘सब काम सरकार करेगा हम बेकार बैठेगा’ ही मानसिकता बदलून सर्वांनी स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याचे आवाह नायडू यांनी केले. नविन कल्पना, नविन मार्गदर्शन घेऊन देश पुढे जात आहे. सबका साथ सबका विकास हा नारा पंतप्रधानांनी दिला आहे. जोपर्यंत शेवटच्या घटकाचे उत्थान होणार नाही तोपर्यंत देशाचे उत्थान होणार नाही. गरिबांसाठी घरे निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे.
पुणेकर शांत, विचारशील, विकासाला साथ देणारे आहेत. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी म्हणजे ‘मेकिंग आॅफ डेव्हलपेंट इंडीया’ असेही त्यांनी ठणकावून सांगत पंतप्रधानांचे कौतुक केले.