मुरलीधर भवार,कल्याण- कल्याण-डोंबिवली शहरे स्मार्ट करण्यासाठी एमएमआरडीएच्या पुढाकाराखाली पालिकेने २८ प्रकल्प विकसित करण्याचे ठरवले आहे. त्यात एरिया बेस डेव्हलपमेंटला प्राधान्य दिले जाणार असून नंतर पॅन सिटीचा- शहर परिसराचा विचार केला जाणार आहे. कल्याण जंक्शनमध्ये सुधारणा, खाडीकिनाऱ्यांचा विकास, स्टेशन परिसरांची सुधारणा यावर यात भर दिला जाणार आहे. अर्थात कल्याणच्या पश्चिमेचा स्कायवॉक यात तुटणार असल्याने नियोजनातील घोळाचा मुद्दा चर्चेला येणार आहे.स्मार्ट सिटीच्या दोन हजार २७ कोटींच्या आराखड्यात एरिया बेस डेव्हलमेंटच्या २० प्रकल्पांसाठी एक हजार ६४३ कोटी, तर पॅन सिटी प्रकल्पांतर्गत आठ योजनांसाठी ३८४ कोटी खर्च होणार आहेत. महापालिकेने रेल्वेस्थानक परिसराचा विकास करण्यावर अधिक भर दिला आहे. कल्याण स्टेशन परिसरात सॅटीस प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी पालिका आणि एमएमआरडीएने कल्याण पश्चिमेला स्टेशन परिसरात उभारलेला ८२ कोटींचा स्कायवॉक तोडावा लागणार आहे. या २८ प्रकल्पांवर स्मार्ट सिटीचा भर असणार आहे. प्रकल्पाच्या कामात पारदर्शकता ठेवण्यासाठी एसपीव्ही स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, शहाड, आंबिवली, टिटवाळा ही रेल्वेस्थानके येतात. त्यातील फक्त कल्याण स्टेशनला प्राधान्य दिले गेले आहे.>विरोधकांनी उचलला ६,५०० कोटींचा मुद्दापारदर्शक कारभाराची हमी देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी डोंबिवलीतील भाजपाच्या विकास परिषदेत साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र त्यांनी ही घोषणा माझी नसून पालिकेचेच नियोजन असल्याची कोलंटउडी मारली. त्यामुळे तेव्हापासून पॅकेज हा विरोधकांच्या चर्चेचा आणि टीकेचा मुद्दा बनला आहे. योजना नक्कीच मोठी : मुख्यमंत्री : कल्याणपर्यंत १४ हजार कोटींची मेट्रो धावणार आहे. तिचा विस्तार तळोजा, शीळफाटापर्यंत करण्यात येणार आहे. ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटी, सीसीटीव्हीसाठी ५२ कोटी आणि सांडपाणी योजनेसाठी १७३ कोटी रुपये मंजूर केल्याने ही रक्कम साडेसहा हजार कोटींपेक्षा नक्कीच मोठी असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. >शहरांतर्गत विकासासाठी...पॅनसिटी अंतर्गत सिटी अॅप तयार करण्यासाठी ३८ कोटी, पाणी व्यवस्थापनासाठी ११८ कोटी, सांडपाणी व्यवस्थापनासाठी चार कोटी २५ लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी ४३ लाख, वाहतूक व्यवस्थापनासाठी ३२ कोटी ७१ लाख, व्हेईकल ट्रेकिंग (जीपीएस) यंत्रणेसाठी ५३ कोटी, वायफायसाठी १३ कोटी आणि सुरक्षा यंत्रणेसाठी १२५ कोटींचा खर्च होणार आहेत. >परिसर विकासावरील खर्चस्टेशन परिसर विकासासाठी एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये रस्त्यांचे जाळे उभारण्यावर ३५ कोटी, जंक्शनचा आराखडा तयार करण्यासाठी पाच कोटी, कल्याण-डोंबिवलीच्या खाडी किनारा विकासासाठी २४ कोटी, घरगुती सांडपाणी जैव प्रक्रिया करून शुद्ध करण्यावर एक कोटी, सोलार पॅनेल आणि एलइडी लाइट बसवण्यासाठी सात कोटी, सुरक्षेच्या पायाभूत कामासाठी दोन कोटी, अतिवृष्टी रोखण्यासाठी भिंत तयार करण्यासाठी दोन कोटी, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी ३२ कोटी, वाडेघर येथे दहा मेट्रिक टन कचऱ्यावर जैवप्रक्रिया करण्यासाठी दोन कोटी, कचरा कुंड्यांकरिता १८ कोटी, उंबर्डे येथे कचऱ्यापासून उर्जा तयार करण्यासाठी १९० कोटी, सांडपाण्याचे जाळे उभारण्यासाठी १२ कोटी ६ लाख, पम्पिंग स्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी, सोलार पॅनेल बसवण्यासाठी २० कोटी ८ लाख, भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी १९ कोटी २ लाख, स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ३० कोटी १६ लाख, सांडपाणी भूमिगत गटारांसाठी १२० कोटी, तलाव विकासासाठी दीड कोटी, सोशल व ट्रंक पायाभूत सोयी-सुविधांसाठी १५५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
स्मार्ट कल्याण-डोंबिवलीसाठी उदंड जाहले प्रकल्प
By admin | Published: March 07, 2017 3:09 AM