मंचर : महात्मा गांधी विद्यालय मंचर येथील आठवीमधील आकाश सीताराम तोत्रे या विद्यार्थ्याच्या ‘स्मार्ट पार्किंग’ या वैज्ञानिक प्रकल्पाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. वाढलेली वाहनांची संख्या, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी त्याने हे मॉडेल बनवले आहे. या प्रकल्पात सौरऊर्जेचा वापर केला असून, रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे वाहने धुतली जाणार आहे.भारत सरकार, राज्य सरकार शिक्षण संशोधन, प्रशिक्षण व विज्ञान संस्था आणि पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इन्सपायर अॅवॉर्ड योजनेंतर्गत बावधन येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिक आकाश तोत्रे याने हा स्मार्ट पार्किंग वैज्ञानिक प्रकल्प सादर केला होता. वाहतूककोंडीची समस्या, जागेचा तुटवडा, अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर, सर्व्हिस सेंटर, टाकावूपासून टिकावू अशा अनेक वैज्ञानिक तत्त्वांचा या प्रकल्पात समावेश असल्यामुळे हा प्रकल्प प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला.राज्य विज्ञान नोडल अधिकारी माधुरी सावरकर, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष एकाड सर आदी मान्यवरांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या. प्राचार्य लक्ष्मण वाळुंज, केशव टेमकर, दिलीप चौधरी, विलास बेंडे, अशरफ पठाण, यादव चासकर, धीरज कोळेकर, अंजली चिखले, प्राची चौधरी यांनी र्माादर्शन केले. रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभाग समन्वय समितीचे सदस्य बाळासाहेब बेंडे, सरपंच दत्ता गांजाळे, सहसचिव उत्तम अवारी, प्राचार्य लक्ष्मण वाळुंज, पर्यवेक्षक माधव कानडे, पंढरीनाथ बारवे, शाळा व्यवस्थापन समिती पालक, शिक्षक संघ, पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आकाश तोत्रे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.स्मार्ट पार्किंगची संकल्पना अशी आहे- सध्या वाहनांची संख्या वाढू लागली असून, रस्ते अक्षरश: अपुरे पडू लागले आहेत. पार्किंगची व्यवस्था कोलमडून पडली आहे. वाहनांना जागाच उपलब्ध नसल्याने ती रस्ते व कोठेही पार्किंग केली जातात. स्मार्ट पार्किंग यासाठी चांगला पर्याय ठरणार असल्याचे या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. कमी जागेत जास्त वाहने बसतील असे मॉडेल आकाश तोत्रे याने तयार केले आहे. सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती होऊन त्याचा उपयोग या प्रकल्पाला होईल. विशेष म्हणजे, पार्किंगच्या ठिकाणीच वाहने धुतली जाणार असून, त्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंगचा वापर होणार आहे.हा प्रकल्प तयार करण्यासाठी तोत्रे याला तब्बल एक महिना लागला. कच्च्या टाकाऊपासून टिकाऊ यामध्ये लोखंड, प्लॅस्टिक, पॉलिमर, अॅक्रेलिक, गिअरबॉक्स, चेनसॉकिट याचा वापर त्याने या प्रयोगात केला आहे. शिक्षकांनी व पालकांनी त्याला यासाठी मदत केली. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात रयत विज्ञान परिषद साधना विद्यालय, हडपसर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या विज्ञान प्रदर्शनात महात्मा गांधी विद्यालय मंचर येथील इयत्ता आठवीमध्ये असणाऱ्या आकाश सीताराम तोत्रे या विद्यार्थ्यांने सहभाग घेतला होता. आकाशने या प्रदर्शनात ए. एस. चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली मोटारसायकल अॅटोमॅटीक साइड स्टँड हे वैज्ञानिक उपकरण तयार केले होते. (वार्ताहर)सध्याच्या धावपळीच्या युगात रस्त्यावर होणाऱ्या विविध अपघातांपैकी मोटारसायकलमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. तसेच, मोटारसायकलच्या साइड स्टँडमुळे सर्वाधिक म्हणजे, ३५ टक्के अपघात होतात. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी या उपकरणाची निर्मिती करण्यात आली होती.मोटारसायकलची चेन व साइड स्टँड यांच्या जोडणीतून साइड स्टँड काढण्याची योजना याद्वारे करण्यात आलेली आहे. जेणेकरून साइड स्टँड पूर्वस्थितीत येऊन होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्याचा उद्देश होता.
वाढलेल्या वाहनांच्या संख्येवर शोधले ‘स्मार्ट पार्किंग’
By admin | Published: February 28, 2017 1:49 AM