मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच अभिनेत्री शबाना आझमी यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या गाडीने ट्रकला धडक दिली होती. येथे या प्रकारचे अपघात सातत्याने घडतात. त्यामुळे महाराष्ट्र हायवे पोलीस आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्या वतीने स्मार्ट पेट्रोलिंग अभियान राबविले जात आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात रोखण्यास मदत होईल, असे सेव्ह लाइफ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तिवारी म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर स्मार्ट पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अतिरिक्त वाहन पुरविणार आहोत. स्मार्ट पेट्रोलिंग वाहनाला दोन रिगार्ड असल्याने, पुढे किंवा पाठीमागे वाहन उभे असल्यास त्याची माहिती मिळते. जर वाहन उभे दिसले, तर त्याला पुढे जाण्यास सांगतो. त्यामुळे अपघात कमी होऊ शकतात.
एमएसआरडीसीने ट्रक स्टॉप सुरू केले आहेत. दोन तासांसाठी ही सुविधा मोफत आहे. येथे वाहन चालकांना विश्रांतीसाठी प्रेरित करतो. यंदा आणखी अपघात कमी व्हावेत, यासाठी स्मार्ट पेट्रोलिंग करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविणार आहोत. या वर्षी अपघातातील मृतांची संख्या शून्यावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले. २०१६ मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झिरो फटॅलिटी कॉरिडॉर सुरू करण्यात आला होता. त्या वर्षी एकूण अपघातांमध्ये १५४ जणांचा मृत्यू झाला होता. त्याला कमी करण्याचे प्रयत्न केले गेले. २०१९ मध्ये हा आकडा ८६ वर आला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीने मोठ्या वाहनाला धडक दिली होती. अशाच प्रकारचे ५० टक्के अपघात येथे होतात. यामागचे महत्त्वाचे कारण अचानक मार्गिका बदलणे, चालकाने पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालविणे हे आहे.
आझमी यांची प्रकृती स्थिरज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे पती ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी प्रसार माध्यमांना दिली. शबाना आझमी यांच्यावर अंधेरीत कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जावेद अख्तर यांनी सांगितले, शबाना आझमी यांच्या विविध वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आले असून त्यात गंभीर जखम दिसून न आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून सुधारत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सीटबेल्टचा वापर न केल्यामुळेच ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना जास्त दुखापत झाली. शबाना आझमी यांचा अपघात झाला, त्यावेळी त्यांची गाडी उजव्या मार्गिकेत होती. ती १०० प्रति किमी वेगाने धावत होती. त्यावेळी त्यांच्या पुढे एक गाडी आली, त्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी डाव्या मार्गिकेत गाडी आणण्यात आली. त्यावेळी धिम्या गतीने जाणाºया ट्रकला गाडीने धडक दिली. शबाना आझमी पाठीमागे बसल्या होत्या, पण त्यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला, गुडघ्याला आणि पाठीला दुखापत झाली, असे सेव्ह लाइफ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष तिवारी यांनी सांगितले.