पुणे : आपल्या व्यवसाय, नोकरीच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच शिक्षण, मनोरंजनासाठी व आप्तेष्टांशी संवादासाठी स्मार्ट फोन अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, स्मार्ट फोनच्या अतिवापराचे व्यसन अत्यंत धोकादायक असून, त्यातून विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन तंत्रज्ञानलेखक सुश्रुत कुलकर्णी यांनी केले.मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्कच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘स्मार्ट फोनचे अंतरंग’ या विषयावर सुश्रुत कुलकर्णी बोलत होते. याप्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, संजय मालती कमलाकर, विलास रबडे, सायन्स पार्क येथील शिक्षणाधिकारी नंदकुमार कासार, सुनील पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.सुश्रुत कुलकर्णी म्हणाले, की स्मार्टफोनमध्ये संवाद, शिक्षण, वाचन, नोंदी ठेवणे, महिला सुरक्षा, मनोरंजन, खरेदी-विक्री यासंबंधित अनेक चांगली अॅप्स आहेत. या सगळ्यात फेसबुक व व्हॉट्सअॅपसारखी सोशल माध्यमे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. तरुणपिढीसह स्मार्टफोन वापरणारे सगळेच या अॅप्सचा वापर करताहेत. परंतु, कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात, तसे तोटेही असतात. स्मार्टफोनचा सतत वापर केल्यास एकटेपणा, निराशा संभवते. बॅटरी उतरण्याचे प्रकार होतात. वेळेपेक्षा अधिक चार्जिंग केल्यास बॅटरी फुगणे व त्यातून अपघात घडण्याचेही प्रकार होतात. त्यामुळे गरजेपुरता आणि चांगल्या कामांसाठीच स्मार्टफोनचा वापर केला पाहिजे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास रबडे यांनी केले. नंदकुमार कासार यांनी आभार मानले.> स्मार्टफोन घेण्यापासून ते वापरताना काय काळजी घ्यावी, अॅप्स कशी इन्स्टॉल करावीत, फेसबुक, व्हॉट्सअॅप ही सोशल माध्यमे कशी वापरावीत, इंटरनेट डेटापॅक कसा पुरवावा आदी गोष्टींविषयी कुलकर्णी यांनी सखोल मार्गदर्शन केले. नागरिकांच्या अनेक शंकाचे निरसन त्यांनी केले.
‘स्मार्ट फोन’चा अतिवापर आरोग्यास घातक
By admin | Published: March 03, 2016 1:42 AM