राजा माने, (सोलापूर, लोकमत संपादक)सोलापूर - केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २0 शहरांची गुरूवारी घोषणा केली, त्यात राज्यातील अवघी दोनच शहरे असून नवव्या क्रमांकांने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला आहे. सोलापूरच्या नावाची घोषणा होताच महापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जल्लोष केला. २९ सप्टेंबर रोजी राज्यातील पहिल्या १00 शहरांत सोलापूरचा समावेश असल्याची घोषणा झाली. तेव्हापासून प्रस्ताव तयार करण्याची सूचना करण्यात आली. यात तीन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात लोकसहभागातून व्हिजन स्टेटमेंट नोंदविण्यात आले. त्यानंतर इफिसिएंट प्रोग्रेसिव्हमध्ये माय गो वेबसाईटवर साडेचार हजार लोकांनी मतेनोंदविली. त्यात क्लीन सिटीवर सर्वाधिक म्हणजे २२.७ टक्के मते नोंदली गेली. पॅनसिटीमध्ये रेट्रोफिटीला प्राधान्य देण्यात आले. त्यात जुन्या गावठाणचा म्हणजे बसस्थानक, स्टेशन, सातरस्ता, रंगभवन, विजापूरवेस, सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला, नवीपेठ या भागाला प्राधान्य दिले गेले. १0४0 एकराचा (४.५ स्क्वे. कि. मी.) गावठाण भाग स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी निवडला गेला. २२८७ कोटी खर्चाचा स्मार्ट सिटी चँलेज प्रस्ताव सादर करण्यात आला. २0२५ पर्यंत संपूर्ण शहर स्मार्ट सिटी होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, सौरऊर्जा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणेवर भर देण्यात आला असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम यांनी दिली. इन्फो..गिरणगावचे ‘व्हिजन’सोलापूरची ओळख गिरणगाव म्हणून आहे. पण अलिकडच्या दोन दशकात ही ओळख पुसली गेली. यामुळे सोलापूरच्या विकासाला खीळ बसली. पाणी व इतर अडचणीमुळे नवे उद्योग येण्यास अडचण निर्माण झाली. पण आता स्मार्ट सिटी योजनेमुळे पायाभूत सुविधांसाठी खास निधी उपलब्ध होणार असल्याने गिरणगावची वाटचाल विकासाच्या दिशेने होणार आहे, अशी भावना येथील नागरिकांत निर्माण झाली आहे.
गिरणगाव बनणार स्मार्ट सोलापूर
By admin | Published: January 28, 2016 8:30 PM