पुणे : विसर्जन मिरवणुकीमध्ये मोबाइल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला. टिळक रस्ता, मध्यवर्ती पेठा, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यांवर मोबाइल चोरट्यांनी शेकडो नागरिकांचे मोबाइल हातोहात लंपास केले. फरासखाना, विश्रामबाग, खडक आणि स्वारगेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक मोबाइल लंपास केल्याचा प्राथमिक आकडा उपलब्ध झाला आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भातील तक्रारी दाखल करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते.गुरुवारी सकाळपासूनच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लक्ष्मी आणि टिळक रस्त्यासह शहराच्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांवर गणेश भक्तांची गर्दी उसळली होती. या गर्दीमध्ये अबालवृद्धांचा सहभाग होता. तरुण तरुणी, आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुणांसोबत अनेकजण कुटुंबासोबत मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर उभे होते. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल लंपास केले. दुपारपासूनच सुरु झालेल्या मोबाईल चोरीच्या घटना संध्याकाळनंतर मोठया प्रमाणावर वाढल्या. अनेकजण पोलीस मदत केंद्रावर जाऊन मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी देत होते. मोबाईल चोरीच्या तक्रारी देण्यासाठी मध्यवस्तीतील मंडई, पेरुगेट, संभाजी, नारायण पेठ, सेनादत्त, शनिवार पेठ, कसबा पेठ, गणेश पेठ, शुक्रवार पेठ, गाडीतळ, साततोटी, रविवार पेठ पोलीस चौक्यांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे मोबाईल चोरी झालेल्यांमध्ये तरुण आणि तरुणींचे प्रमाण सर्वाधिक होते. शुक्रवारी रात्रीपर्यंत फरासखाना पोलीस ठाण्यात २००, तर विश्रामबाग पोलीस ठाण्यात २०० च्या आसपास तक्रारी आलेल्या होत्या. यासोबत स्वारगेट आणि खडक पोलीस ठाण्यांमध्ये मिळून ५० पेक्षा अधिक तक्रारी दाखल झालेल्या होत्या.
स्मार्ट चोरांचा मिरवणुकीत दीड हजारांवर मोबाइलवर डल्ला
By admin | Published: September 17, 2016 12:49 AM