ब्रह्मानंद जाधव/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 24 - बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. या आॅपरेशन मुस्कानमुळे हरवलेल्या बालकांना शोधण्यास जिल्ह्यातील पोलिसांना यश आल्याने हरवलेल्या १ हजार २०७ बालकांच्या चेहऱ्यावर मुस्कान परत आली.अल्पवयीन मुले हरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हरवलेल्या मुलांना सुखरूप शोधणे व आई-वडिलांच्या ताब्यात देणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहखात्याच्या आदेशानुसार जिल्ह्यात गतवर्षीपासून आॅपरेश मुस्कान राबविण्यात येत आहे. १ ते ३० आॅगस्ट २०१५ मध्ये सुरूवातीला मुस्कानमोहिम हाती घेण्यात आली. त्यानंतर २०१६ या वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल व जून महिन्यात पुन्हा आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक स्थळे, आश्रम, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणची व भीक मागणाऱ्या मुलांची चौकशी मोहीम हाती घेण्यात आली. जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात राबविण्यात आलेल्या आॅपरेशन मुस्कानमुळे हरवलेल्या १ हजार २०७ बालकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. आॅपरेशन मुस्कानमध्ये १ ते ३० आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातील पोलिसांनी २३८ बालकांचा शोध घेतला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १ ते ३१ जानेवारी २०१६ मध्ये ४५४ बालकांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. १ ते ३१ एप्रिलमध्ये राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानच्या तिसऱ्या टप्प्यात १११ बालकांचा शोध लागला. तर १ ते ३० जून २०१६ या चौथ्या टप्प्यामध्ये ४०४ बालकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिस यंत्रणेने आश्रमगृह, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्ते, धार्मिक स्थळे, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी राहणारी मुले व रस्त्यावर भीक मागणारी मुले यांची पडताळणी करून एखादे मुल जर बेपत्ता होऊन त्या ठिकाणी वास्तव करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या मुलांचे आई-वडील, कायदेशीर पालक यांचा शोध घेऊन ती मुले त्यांच्या ताब्यात देली.आॅपरेशन मुस्कानमध्ये यांनी घेतला सहभागजिल्हा पोलीस अधीक्षक संजीव कुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर, एल.सी.बी. पीआय प्रतापसिंग शिखारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद यंडोले, डीसीपीओ शहानवाज खान, पीएसआय कल्पना गवई, एएसआय अंभोरे, गजानन चतुर, जाधव यांनी सहभाग घेतल्यामुळे हरवलेल्या हजारो बालकांच्या चेहऱ्यावर मुस्कान परत आणण्यास पोलिस यंत्रणेला यश आले.जूनमध्ये ४०४ बालकांचा शोध आॅपरेशन मुस्कानमुळे १ ते ३० जून २०१६ मध्ये ४०४ बालकांचा शोध लागला आहे.त्यामध्ये पोलिस विभागाच्या पथकाने ४६ व एल.सी.बी.च्या पथकाने ३५८ बालकांचा शोध लावला आहे. यात २११ मुले व १९३ मुलींचा समावेश आहे. शोध लागलेले ४०४ बालके आई-वडिल किंवा कायदेशीर पालकत्व असलेल्यांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आली आहेत.असा लागला बालकांचा शोधआॅगस्ट 238जानेवारी 454एप्रिल 111जून 404