नाशिक : माजी आमदार वसंत गिते यांचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ मंजूर केला. परंतु त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने भाजपा आणि शिवसेनेत अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. गिते यांनी राजीनामा देताच आधी भाजपा आणि त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. तथापि, भाजपाच्या देवयानी फरांदे आणि गिते यांच्यात सख्य नाही. पूर्वी गिते आणि देवयानी यांचे पती सुहास फरांदे यांचे मैत्रीचे संबंध होते; मात्र महापालिकेत सेना-भाजपा युती सत्तेत असताना स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेविका शीला भागवत यांच्या कथित अपहरण प्रकरणावरून फरांदे-गिते यांच्यात वितुष्ट झाले. शिवसेनेतही गिते आले तर शहर आणि जिल्हाप्रमुखपदावर दावे सांगू शकतात, या शक्यतेने संपर्कप्रमुख रवींद्र्र मिर्लेकर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यांनी संबंधितांची कानउघडणी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच गितेंची भेट घेणाऱ्या अॅड. शिवाजी सहाणे यांनी, आपण गिते यांना व्यक्तिगत संबंधातून भेटण्यास गेलो होतो. पक्षात कोणाला निमंत्रित करण्याचा आपल्याला अधिकार नाही, त्यामुळे कोणाला निमंत्रितही केले नसल्याची सारवासारव केली आहे. त्यामुळे गिते यांना पक्षात घेण्यास भाजपा-सेना इच्छुक असल्याचे भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
गितेंच्या निमंत्रणावरून धुसफुस
By admin | Published: November 06, 2014 4:03 AM