मुंबई : एकीकडे मुंबै बँक ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसलेली असताना भाजपात मात्र बँकेची निवडणूक लढविण्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. ज्यांच्यावर आपणच भ्रष्टाचाराचे आरोप केले आता त्यांच्यासाठी कसे राबायचे, असा सवाल करीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. मुंबई विकास आराखडा आणि मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्या शासकीय निवास्थानी झालेल्या बैठकीत मुंबै बँकेच्या प्रश्नावर पक्षाची अडचण समोर आली. मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर असणारे माजी आ. प्रवीण दरेकर यांच्या कार्यकाळात तब्बल ४०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेत्यांनीच केला होता. त्यासाठी आंदोलनाचा पवित्राही घेतला. विविध समित्यांच्या चौकशीत संचालकांवर ठपका ठेवला. आरोपपत्र दाखल केले असून, न्यायालयानेही याबाबत लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. असे असताना केवळ प्रवीण दरेकर भाजपात आल्याने त्याकडे कसे दुर्लक्ष करायचे, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला सारत बँकेच्या निवडणुकीत पक्ष सक्रिय झाल्यास महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो. शिवसेना याचे नक्कीच भांडवल करेल, अशी भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
मुंबै बँकेवरून धुसफूस
By admin | Published: February 24, 2015 4:17 AM