अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 02:14 AM2018-11-02T02:14:54+5:302018-11-02T06:40:26+5:30
देशात सध्या फसवाफसवी आणि बनवाबनवी सुरू आहे. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत मोठी तफावत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली.
पुणे : ‘‘पंतप्रधानांनी स्वत:ला प्रधानसेवक, तर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सेवक म्हणून घ्यायला सुरुवात केली; मात्र त्यांच्या वागण्यात कोठेच सेवकांचा भाव दिसत नाही. याउलट, आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. देशात सध्या फसवाफसवी आणि बनवाबनवी सुरू आहे. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत मोठी तफावत आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कारांचे पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, सभापती राणी शेळके, प्रवीण माने, सुजाता पवार, सुरेखा चौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘बेटी बचाव व बेटी बढाव’ कार्यक्रमांतर्गत गुड्डा-गुड्डी फलकाचे अनावरण करण्यात आले.
पवार म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीच्या वेळेस अंगणवाडी सेविकांना किमान दररोज साडेतीनशे रुपये मानधन देऊ, अशी घोषणा भाजपाने दिली होती. आता सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली; मात्र या घोषणेचा सरकारला विसर पडला आहे. राज्यात २ लाख सेविका आहेत. त्यांना १८ हजार रुपये मानधन मिळालाय हवे. तेलंगणा, केरळमध्ये अंगणवाडी सेविकांना १० हजार, हरियाणामध्ये ८ हजार रुपये मानधन मिळते. मग, महाराष्ट्रात द्यायला काय हरकत आहे? मानधन वाढविणे सोडाच; पण आपल्या हक्काच्या मानधनासाठी संप पुकारणाºया सेविकांवर मेस्मा कायद्याचा बडगा उगारला. अवघ्या दीड हजाराची वाढ करून सेविकांची बोळवण सरकारने केली. राणी शेळके म्हणाले, ‘‘पोषण आहार निकृष्ट दर्जाचा मिळत आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. यासाठी निधीची मोठी कमतरता आहे. याकडे प्राधान्याने लक्ष देऊन ही समस्या सोडविण्यात यावी.’’
सूरज मांढरे म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत किंवा इतर ठिकाणी गेले असता नाइलाजास्तव कारवाई करावी लागते. तेथे नकारात्मक काम दिसते. मात्र, अंगणवाडीत गेल्यावर समाधान मिळते.’’ लवकरात लवकर १०० टक्के अंगणवाद्यांना नळ आणि वीज जोड दिला जाईल.’’ आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. दीपक चाटे यांनी आभार मानले.
सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे. जनता सुज्ञ आहे. यामुळे पुढच्या वर्षी परिस्थिती वेगळी असेल. अंगणवाडीसेविकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला वाचा फोडणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सांगून विधान परिषदेत लक्षवेधीमध्ये सेविकांचे प्रश्न मांडण्यात येतील.’’
- अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री