नरेश डोंगरे,ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि.13- गणेशोत्सव-लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घरची मंडळी बाहेर जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरात हातसफाई सुरू केली आहे. ९ ते १२ सप्टेंबर या तीन दिवसात चोरट्यांनी एमाआयडीसी, यशोधरानगर आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करून सोने आणि रोकड लंपास केली. एमआयडीसीत तर नवीन घरात घरमालक राहायला जाण्यापूर्वीच चोरटे पोहचले आणि त्यांनी रोख रक्कम तसेच दागिने चोरून नेले.
एमआयडीसीतील हरिशचंद्र धनसिंग जाधव (वय ५१) यांनी मातोश्रीनगरात नवीन घर घेतले. रविवारी त्यांनी आपले सामान नवीन घरात शिफ्ट केले. मात्र, पूजा वगैरे करायची असल्याने ते जुन्याच घरी झोपले. सोमवारी दुपारी तीन वाजता जाधव परिवार नवीन घरी आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. चोरट्याने त्यांच्या दाराचे कुलूप तोडून नवीन घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने आणि रोख ३० हजार असा सव्वालाखाचा ऐवज चोरून नेला होता. जाधव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
यशोधरानगरातील बिनाकी मंगळवारी (कांजी हाऊस चौक) परिसरात राहणारे टिकाराम लक्ष्मण निमजे (वय ५०) हे ९ सप्टेंबरला सहपरीवारा रायपूरला गेले होते. १२ सप्टेंबरला ते परत आले. या कालावधीत चोरट्याने त्यांच्या दाराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच सॅमसंग मोबाईल आणि २० हजार रुपये असा एकूण १ लाख, ५३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
अशाच प्रकारे वाडीतील मंगलधाम सोसायटीत राहणा-या योगिता दिनेश उपासे (वय २५) यांच्या घरातून चोरट्यांनी २० हजार रुपये, एक मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता योगिता उपासे खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी हात मारला. वाडी पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.