नवी मुंबई : शहरातील तरुणाईत धूमस्टाईल मोटारसायकल चालविण्याचे फॅड चांगलेच रुजले आहे. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. विशेष म्हणजे अशा पध्दतीने दुचाकी चालविणाऱ्यांत बहुतांशी अल्पवयीन मुले असल्याचे दिसून आले आहे. परंतु यापुढे अल्पवयीन मुलगा दुचाकी चालविताना आढळून आल्यास थेट त्या वाहनांच्या मालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तशा आशयाचा फतवा नवी मुंबई आरटीओ कार्यालयाने काढला आहे.मोटर वाहन कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना कोणतेही वाहन चालविण्याचा परवाना दिला जात नाही. मात्र त्यानंतरही शहरात अनेक अल्पवयीन मुले सुसाट दुचाकी चालविताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी सुसाट वेगाने चालविल्या जाणाऱ्या या दुचाकींमुळे अनेकदा अपघातांना आमंत्रण मिळते. वाशी शहरात मिनी चौपाटी, सागर विहार तसेच महाविद्यालये व शाळांच्या परिसरातील रस्ते आदी ठिकाणी धूमस्टाईल दुचाकीस्वारांचा सर्रास वावर दिसून येतो. वाशीप्रमाणेच पामबीच मार्ग, नेरूळ, सीबीडी येथील सार्वजनिक ठिकाणांवर मोटरसायकल चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांचे लक्षणीय प्रमाण दिसून येते. परंतु आता मोटर वाहन कायद्यातील नियम व अटींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय आरटीओ कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार यापुढे १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलगा दुचाकी चालविताना आढळून आल्यास मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहनाच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन नवी मुंबई आरटीओ कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहन १८ वर्षांखालील मुलांना चालविण्यासाठी देवू नये, असे आवाहन आरटीओच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
धूमस्टाईल दुचाकी चालविणाऱ्यांना बसणार जरब
By admin | Published: September 21, 2016 3:11 AM