- रवींद्र देशमुख
मुंबई - कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं तर सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे सातत्य. जे काम करत असाल, त्यात सातत्य ठेवलं तर एक दिवस तुम्हाला यश येतच, याची अनेक उदाहरणे आहेत. या उदाहरणांमध्ये आता नवनिर्वाचित महिला खासदार स्मृती इराणी आणि नवनीत कौर राणा यांचा, समावेश झाला. राजकीय पक्षाची एका विशिष्ट मतदार संघातील अनेक वर्षांची मक्तेदारी या दोघींनी मोडून काढली. त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुका नावावर होणार नाहीत, तर तुमच्या कर्तृत्वावर होणार हेच इराणी आणि नवनीत राणा यांनी दाखवून दिले. हीच बदलत्या राजकारणाची नांदी ठरणार असंच दिसत आहे.
अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांनी सातत्याच्या जोरावर सर्वांना अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया जिंकल्या. लोकसभेत इराणी अमेठीचे तर नवनीत राणा अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
महाराष्ट्राच्या सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनाचा गड असलेला अमरावतीत अशक्यप्राय विजय मिळवला. २०१४ मध्ये आनंदराव अडसुळांनी कडवी झुंज देत पराभूत झाल्यानंतर देखील नवनीत राणा यांनी मतदार संघातील संपर्क कायम ठेवला. पराभवानंतर खचून न जाता नवनीत यांनी पूर्ण ताकतीने मतदार संघातील लोकांच्या समस्या सोडविल्या. सत्ता किंवा कुठलेही पद नसताना त्या नागरिकांच्या अडचणीत वेळोवेळी धावून गेल्या. अखेरीस २०१९ उजडेपर्यंत त्यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. येथील जनतेने दिलेली साथ, यामुळे नवनीत यांनी शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांना अखेरीस पराभूत केले.
स्मृतींचा काँग्रेसच्या मुळाशी घाव
स्मृती इराणी यांची स्टोरी देखील नवनीत राणा यांच्याप्रमाणेच आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीत गांधी घराण्यातील व्यक्तीला पराभूत करणे २०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत स्वप्नवत होते. २०१४ मध्ये राहुल गांधी यांना कडवी झुंज देताना स्मृती इराणी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, भाजप नेतृत्वाने इराणी यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना केंद्रीयमंत्रीपद दिले. मंत्रीपद मिळाल्यानंतर स्मृती इराणी यांनी अमेठी मतदार संघावर अधिक लक्ष केंद्रीत केले. एवढंच काय तर अमेठीत विकासकामे केली. तसेच अडचणीच्या काळात मतदार संघातील लोकांच्या मदतीला धावून गेल्या.
२०१९ निवडणूक येईपर्यंत इराणी यांनी अमेठीतील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. पाच वर्षे अमेठीवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या इराणी यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि पराभवाच्या भितीनेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदार संघ बदलल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. निकालानंतर यात काही प्रमाणात तथ्य आढळून आले. मात्र राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढविणे काँग्रेसची दक्षिण भारतात मुळं मजबूत करण्याची रणनिती होती, हे मान्य करावे लागेल. परंतु, यामुळे इराणी यांच्या विजयाची उंची नक्कीच कमी होणार नाही, हे देखील तितकच खरं आहे. इराणी यांना 'ब्रह्मास्त्र' बनवून भाजपने काँग्रेसच्या मुळावरच घाव घातला.
इराणी यांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर काँग्रेसचा गढ जिंकला. तर नवनीत राणा यांनी शिवसेनेचा अमरावती गड पाडला. दोघीही अभिनय क्षेत्रातून राजकारणात दाखल झाल्या असून लोकसभेत जनतेच्या प्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत. हे लोकशाहीतच शक्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. फरक एवढाच की, स्मृती इराणी सत्ताधारी तर नवनीत राणा विरोधी बाकावर असतील.