- हेमंत आवारी, अकोले (नगर)
नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने प्रशासनाने डम्पर, ट्रकचालकांवर कारवाई केली. वाहने, वाळू जप्तीची मोहीम राबविली, मात्र वाळू तस्करांनी आता चक्क गाढवांवरुनच वाळू वाहतूक करण्याचा पर्याय अवलंबला आहे़ सध्या अकोले तालुक्यातील मुळा नदी पात्रालगत शेकडो गाढवं फिरताना दिसत आहेत़वाळू, माती वाहण्यासाठी पूर्वी सर्रास गाढवांचा वापर व्हायचा़ गाढवांची जागा ट्रॅक्टर, ट्रक, डम्परने घेतली़ वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू केली़ ही वाहने सोडविण्यासाठी लाखो रुपयांचा दंडही भरावा लागतो़ त्यामुळे वाळू तस्करांनी पुन्हा गाढवांवरुन वाळू वाहतूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे़अकोले तालुक्यात प्रवरा नदी पात्रातील वाळू उपशाचा महसूल प्रशासनाकडून अद्याप एकही लिलाव झाला नाही. तालुक्यात ठराविक ठिकाणीच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे़ तालुक्यातील मुळा नदी पात्रालगत शेकडो गाढवं फिरताना दिसत आहेत़ आता महसूल प्रशासन वाळू तस्करी रोखणार कशी? पकडलेल्या गाढवांचे करायचे काय, असा पेच प्रशासनासमोर उभा ठाकला आहे़अशी होते तस्करी...गाढवांच्या पाठीवर पोते बांधायचे़ त्यात वाळू भरायची़ एका गाढवाच्या पाठीवरुन ५० किलोपेक्षा जास्त वाळू एका वेळी वाहून नेली जात आहे़ दिवसभर या गाढवांच्या खेपा करुन एका ठिकाणी वाळू साठविली जाते़ प्रशासन कोड्यातगाढवं पकडून ठेवायची कोठे, पकडलेली गाढवं राखायची कोणी, त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था कोणी करायची, असे प्रश्न प्रशासनासमोर उभे ठाकले आहेत़