सांगली : सांबरांच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या टोळीतील सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सांबराचे शिंग, चार मोबाईल, चाकू व आलिशान मोटार असा एकूण १३ लाख ३५ हजारांचा माल जप्त केला आहे. या शिंगाची तस्करी ते पुण्यापर्यंत करणार होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. अटक केलेल्यांमध्ये कृष्णा शिवाजी मोहिते (वय २६, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज), महेश मोहन राव (२६, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, हडको कॉलनी, अभयनगर, सांगली), अतुल बाबासाहेब कल्याणी (३६, रुकडी, ता. हातकणंगले) व चंद्रकांत बाबासाहेब कांबळे (२५, नेज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. हे चौघेही मोटार (एमएच ०९ डीएक्स ०३०२) या आलिशान मोटारीतून सांबराच्या शिंगाची पुण्यापर्यंत तस्करी करणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सांगलीवाडीतील एका ढाब्याजवळ सापळा लावला. त्यावेळी मिळालेल्या माहितीप्रमाणे या क्रमांकाची मोटार जात असताना, पोलिसांनी ती थांबविली. झडती घेतल्यानंतर मोटारीत सांबराचे शिंग सापडले. त्यानंतर चौघांना अटक केली. त्यांच्याकडील चार मोबाईल व एक चाकूही जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी शहर पोलिस (पान १० वर)पुण्यात चार लाखाला सौदापोलिस उपअधीक्षक दीपाली काळे म्हणाल्या, सांबराच्या शिंगाची तस्करी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. गरज पडल्यास वन विभागाची मदत घेण्यात येईल. संशयितांनीही हे शिंग दुसऱ्याकडून विक्रीसाठी घेतले आहे. हे शिंग ते पुण्यातील एका व्यक्तीला विकणार होते. यासाठी त्यांनी चार लाखाचा सौदा केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किती किंमत आहे, हे तपासले जाईल. त्यांनी चाकू कशासाठी बाळगला होता, याचाही उलगडा केला जाईल. यामध्ये आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल.
सांबराच्या शिंगाची तस्करी; चौघांना अटक
By admin | Published: February 10, 2017 11:42 PM