राजेंद्र शर्मा
धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील कुंभार शाळेतील किचनमध्ये आढळलेल्या मादा पानदिवड जमातीच्या सापांनी ७६ अंडी दिली. ती जतन करून त्यातून पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र दिनेश बोरसे यांनी वन विभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने येथील वनक्षेत्रात सुखरूपरीत्या सोडले.
१८ फेब्रुवारी रोजी वाघाडी येथील भुरा काटवाडी यांच्या बाथरूममध्ये पानदिवड जातीचा सर्प आढळून आला. त्यांनी सर्पमित्र दिनेश बोरसे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. सर्पमित्र दिनेश बोरसे हे त्या ठिकाणी आले असता त्यांना कुंभार शाळेतील किचन हॉलमध्ये पानदिवड जातीच्या दोन मादी आढळून आल्या. अथक प्रयत्नानंतर बोरसे यांनी दोन्ही मादी साप पकडून त्यांना बरणीत टाकून व्यवस्थितरीत्या घरी आणले. या दोन्ही मादी सर्पांनी बरणीत एकूण ७६ अंडी दिली. २८ मार्च रोजी या अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली. सर्पमित्र दिनेश बोरसे यांनी वन विभागाशी संपर्क साधून त्यांना सदर माहिती दिली. सर्पमित्र रोहित माळी, प्रमोद महाजन हिरालाल पाटील, मुक्तार फकीर, योगेश सोलंकी व प्रादेशिक वन विभाग शिरपूरचे वनपाल पी.एच. माळी, वनमजूर तुकाराम पावरा यांच्या समक्ष त्या पिल्लांना वनक्षेत्रात सोडण्यात आले.
असा आहे पानदिवड !पानदिवड हा साप बिनविषारी असून सामान्यतः फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान त्याचा प्रजनन कालावधी असतो. हा साप सरासरीपाच फूट एवढा वाढतो त्यानंतर त्याची वाढ होत नाही. मग तो शरीराने जाड होतो. हा साप सर्वात जास्त गटारीत आढळून येतो. या सापाचे मुख्य खाद्य मासे, बेडूक, सरडे हे आहे. याला खाद्य मिळाले नाही तर हा स्वतःची शेपटी तोडून खातो. हा साप सर्वात जास्त बेडकांवर ताव मारतो. या सापास इंग्रजीत Indian commoncheckled kill back water snake असे म्हणतात.