ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 7 - वडाळा रोडवर एका महिलेला राहत्या घरात अचानकपणे साप चावल्याची घटना घडली. या घटनेला सोशल मीडियावर वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आणि सायंकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत संपूर्ण शहरात अफवांचेच विष पसरत गेले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक महिला अत्यवस्थ झाली. तिला रहिवाशांनी तत्काळ रुग्णालयात हलविले आणि तिच्यावर तत्काळ उपचारही सुरू झाले; मात्र याबरोबरच शहरात व्हॉटसअॅपवरुन या घटनेची जी पोस्ट पसरली त्यामधून घटना वेगळ्याच वळणावर पोहचली. एका महिलेने रागाच्या भरात बदला घेण्यासाठी पर्समधून साप आणला आणि तो त्या महिलेच्या फ्लॅटमध्ये सोडला अशी वार्ता पसरविली गेली. यामुळे मुंबईनाका पोलीसही घटनास्थळी पोहचले. व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता पडताळून बघण्यासाठी पोलिसांनी एक नव्हे तर दोन सर्पमित्रांना पाचारण करत संबंधित महिलेचे घर पिंजून काढले; मात्र कथित सर्प कोठेही आढळून आला नाही. तसेच ज्या रुग्णालयात महिलेला उपचारार्थ दाखल केले त्या रुग्णालयाच्या वैद्यकिय सुत्रांनी देखील सर्पदंश झाल्याची नोंद पोलीस ठाण्याला पाठविली; मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला असता त्यांनी सर्पदंशाबाबत साशंकता व्यक्त केली. त्यामुळे महिला नेमकी अत्यवस्थ कशामुळे झाली हे कोडे रात्रभर उलगडले नव्हते. महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ती बेशुध्द असल्यामुळे नेमका काय प्रकार घडला त्याबाबत महिला शुध्दीवर आल्यानंतरच खुलासा होणार हे तितकेच खरे! लढविले तर्क-वितर्क एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर साप सोडला अशी पोस्ट व्हॉटसअॅपवरुन वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वांचीच दमछाक झाली. पोलीस, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, नागरिक, सर्पमित्र अशा सर्वांनीच संबंधित कुटुंबाला गाठले आणि महिलेच्या अन्य नातेवाईकांवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला; मात्र जेव्हा ही घटना घडली तेव्हा महिला घरात एकटीच होती त्यामुळे आम्ही कुठलेही स्पष्टीकरण देऊ शकत नाही असे नातेवाईकांनी सांगितले.वडाळा रोडवरील घटनेत एक विवाहित महिला बेशुद्ध असून तिच्या नातेवाईकांनी जवळील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले आहे़ या महिलेस नक्की सर्पदंश झाला की अन्य विषारी किटकाने चावा घेतला याबाबत डॉक्टरांनी आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही़ संबंधित महिला शुद्धीवर आल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल़ - आनंद वाघ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे़