पुणे - उत्तरेकडे सुरू असलेल्या पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंझावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व बर्फवृष्टीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच १ फेब्रुवारीपर्यंत जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री सेल्सिअस म्हणजे सरासरीइतके, तर काही भागांत सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व छत्रपती संभाजीनगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रींनी अधिक तर दुपारी कमाल ३० डिग्री सेल्सिअस असू शकते.
काय आहे अंदाजउत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरीइतके म्हणजे १४ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.