पुणे : राज्यात पाण्याची भीषण टंचाई असताना पुणेकरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे़ जर, ४० लाख पुणेकरांनी आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तर तब्बल ४ कोटी लिटर पाणी वाचविता येईल़ या व अशा अनेक पाणीबचतीचे उपाय लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न तरुणांचा एक गट ‘अंघोळीची गोळी’ या उपक्रमातून करीत आहे़ अंघोळीसाठी प्रत्येक जण २० लिटर पाणी वापरतो़ आठवड्यातून एक दिवस अंघोळ न करता केवळ हात, पाय, तोंड धुतले, तर त्यासाठी १० लिटर पाणी लागेल़ प्रत्येक जण १० लिटर पाणी वाचवू शकेल़ अशा प्रकारे ४० लाख पुणेकर किमान ४ कोटी लिटर पाणी वाचवू शकतील़ या शिवाय छोट्या छोट्या उपायातून मोठ्या प्रमाणावर पाणीबचत करता येऊ शकते़ या उपक्रमाचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, की पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे हे सांगत असल्याची बातमी टीव्हीवर पाहत होते. त्या वेळी सहजपणे मीही उद्यापासून एक दिवसाआड अंघोळ करणार, असे म्हटले़ त्यातूनच पाणीबचत कशी करता येईल, याचा विचार करण्यास सुरुवात केली़ काही डॉक्टर मित्रांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, की आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तरी वैद्यकीयदृष्ट्या फरक पडत नाही़ हात, पाय, तोंड स्वच्छ धुतले, तरी चालू शकते़ विद्यापीठात एम़ ए़ (तत्त्वज्ञान)ला माझ्याबरोबर शिकत असलेल्या मित्रांची या उपक्रमाला साथ मिळाली़ सोशल मीडियामार्फत आम्ही हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत़ वाचविलेले हे पाणी आपण येणाऱ्या काळातील पाणीटंचाई कमी करण्यास साहाय्यभूत ठरू शकते़पाणीटंचाईचे गांभीर्य विचारात घेऊन सर्वांनीच पाणीबचतीचा उपक्रम राबविल्यास, तसेच काटकसर केल्यास आणखी काही महिने पाणी पुरवून वापरता येईल.
बचतीसाठी ‘अंघोळीची गोळी’
By admin | Published: April 28, 2016 12:57 AM