-ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.11- पुणे शहरासाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. पुण्याच्या याच वाहतुक कोंडीचा फटका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना बसला आहे. त्यामुळे पवारांवर चक्क रिक्षाने प्रवास करण्याची वेळ आली.
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी शनिवारी अजित पवार पुण्यात आले होते. मात्र शनिवार असल्याने रस्त्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वर गणपतीचे दर्शन झाल्यानंतर पवार मानाचा पाचवा केसरीवाड्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघाले. मात्र,अप्पा बळवंत चौकात वाहतुक कोंडी झाल्याने गाडीने जाणे त्यांना शक्य झाले नाही लागलीच त्यांनी रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी रिक्षामध्ये पवारांसोबत महापौर प्रशांत जगताप आणि सभागृह नेते शंकर केमसे हे देखील होते.
अजित पवारांना रिक्षा मधून उतरताना पाहून तिथे उपस्थित असलेले नागरिकदेखील अवाक झाले.