मुंबई : वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, तेथील गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. यावरून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट दु:खच आहे. तिच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. मात्र, वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे आले आहे. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
वाघ हे जंटलमन असतात. त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांना त्रास दिला तर ते प्रतिक्रिया देतात आणि त्यातून ते नरभक्षक बनतात. या वाघिणीच्या बाबतीत पूर्वी कधीतरी असे झाले असावे, अशी शक्यताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.