...म्हणून भाजपा फोडाफोडी करतोय, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 02:51 PM2024-02-12T14:51:00+5:302024-02-12T14:51:19+5:30
Uddhav Thackeray Criticize BJP: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. भाजपामध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. भाजपामध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना अशोक चव्हाण यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं. कालपरवापर्यंत जागावाटपामध्ये हिरीरीने सहभाग घेत होते. मग आज असं अचानक काय घडलं की, अशोक चव्हाण तिकडे जात आहेत, सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. निवडणूक आयोगाने शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी काँग्रेसही चोराच्या हातात दिली. आता काँग्रेससुद्धा अशोकरावांच्या हातात देतात की काय हे पाहावे लागेल. कारण हे काहीही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटताहेत. बेटकुळ्या तर काय येतच नाहीयेत, बेटकुळ्यासुद्धा भाड्याने घ्याव्या लागत आहेत.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संसदेमध्ये सुद्धा पंतप्रधानांनी भाषण केलं. अबकी बार एवढे पार, अबकी पार तेवढे पार, मग जर एवढे पार असतील तर मग ही फोडाफोडी का करत आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे. तुम्ही ४०० पार काय, ४० पार पण होणार नाही आहात. म्हणून मग तिकडे नितीश कुमारांना घेतलं जातंय, इकडे अशोक चव्हाणांना घेतलं जातंय. अजित पवारांना घेतलं. शिंदेंना घेतलं. भाजपाने दहा वर्षे जर प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर ही वेळ आली नसती. सगळी भाडोत्री लोकं घेतली जात आहेत. बाजारबुणगे घेतले जात आहेत आणि ते भाजपामधले निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत त्यांच्या बोडक्यावर बसवले जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
त्यांनी पुढे सांगितले की, काही वर्षांपूर्वी काँग्रेसमुक्त भारत असा भाजपाचा नारा होता. मात्र आता आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेताहेत की, आता काँग्रेसव्याप्त भाजपा अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. आणखी काही वर्षांनी असंही होईल की, भाजपाचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष तुम्ही ज्या पद्धतीने नष्ट करायला निघाला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.