मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, मद्य, मादक पदार्थ, सोने-चांदी आदींचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सोमवारी दिली.शिंदे म्हणाले की, विविध विभागांकडून केलेल्या कारवाईमध्ये ४६ कोटी ६२ लाखांची रोकड, २३ कोटी ९६ लाखांची (तब्बल ३ कोटी ८ लाख ७९३ लिटर) दारु, ७ कोटी ६१ लाखांचे मादक पदार्थ, ४५ कोटी ४७ लाखांचे सोने, चांदी असे एकूण १२३कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडीत २२ हजार ७९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ७६ गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक अशा स्वरुपाचे १४ हजार ५८३ गुन्हे, बेकायदेशीररित्या शस्त्र निर्मिती, विक्री, त्याचे प्रदर्शन, शस्त्र जवळ बाळगणे आदींबाबत ७४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नशेचे पदार्थ (नारकोटिक्स ड्रग्ज) बाळगल्याबाबतचे १२६, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत १२ गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत ६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत मालमत्तेचे विद्रुपीकरण अंतर्गत ६६ आणि इतर २८ गुन्ह्यांचा समावेश आहे.४० हजार ३३७ शस्त्रे जमाआचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकांकडून ४० हजार ३३७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली ३० शस्त्रे जप्त करण्यात आली असून १३५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय १ हजार ५७१ विनापरवाना शस्त्रे, ५६६ काडतुसे आणि १८ हजार ५१३ जिलेटीन आदी स्वरूपाचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.‘सी-व्हिजिल’वर ३ हजार ५६१ तक्रारीसी-व्हिजिल अॅपवर आतापर्यंत ३ हजार ५६१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २ हजार ३४ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून, त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.या अॅपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, मालमत्तेचे विद्रुपीकरण अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
राज्यभरात आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:01 AM