लातूर : मिरजहून सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५० वॅगनच्या जलपरीने २५ लाख लीटर पाणी लातुरात आणले. आतापर्यंत मिरजेहून कृष्णेचे ९५ लाख लीटर पाणी लातुरात आले आहे. जलपरीच्या ५० वॅगनची पहिली फेरी बुधवारी सकाळी झाली.गुरुवारी सकाळी या वॅगनमधील पाणी केवळ ६.३० तासांत उतरवून घेण्यात आले. त्यानंतर १ वाजून १५ मिनिटांनी जलपरी मिरजच्या दिशेने रवाना झाली. आता ५० वॅगनच्या जलपरीची दररोज १ खेप होणार असल्याचे रेल्वेसूत्रांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत १० वॅगनच्या ९ फेऱ्या झाल्या असून, ५० वॅगनच्या दोन फेऱ्या जलपरीने केल्या आहेत. ५० वॅगनच्या दोन फेऱ्यांतून ५० लाख लीटर आणि १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांतून ४५ लाख लीटर असे एकूण ९५ लाख लीटर कृष्णेचे पाणी आतापर्यंत लातूरकरांना मिळाले आहे. (वार्ताहर)मिरज : मिरजेतून ५० रेल्वे टॅँकरमधून २५ लाख लीटर पाण्याची तिसरी खेप लातूरला पाठविण्यात आली. गुरुवारी जलदूत एक्स्प्रेस रवाना झाली. मिरज रेल्वे जलशुद्धीकरण केंद्रापासून अडीच किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून दररोज २५ लाख लीटर पाणी भरून जलदूत एक्स्प्रेस लातूरला जात आहे. दिवसभर पाणी भरण्याचे काम पूर्ण झाल्याने रात्री जलदूत एक्स्प्रेस लातूरकडे रवाना झाली. ५० रेल्वे टॅँकर भरण्यासाठी नदीतील जॅकवेल व हैदरखान विहिरीतील पंप सुरू करण्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मिरजेतून रेल्वेने केलेल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मिरजेला येणार आहेत. लातूर : ‘जलयुक्त लातूर, सर्वांसाठी पाणी’ ही संकल्पना घेऊन गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेल्या मांजरा नदीवरील साई बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील नागझरी बंधाऱ्यावरील कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात येणार असल्याची माहिती जलयुक्त लातूर व्यवस्थापन समितीचे डॉ़ अशोक कुकडे यांनी पत्र परिषदेत दिले़जलयुक्त चळवळीच्या मदतीसाठी सर्वच स्तरांतील दानशूर लातूरकर सरसावले आहेत़ या माध्यमातून आजपर्यंत ३ कोटी ७५ लाखांचा निधी संकलित करण्यात आला असल्याचे कुकडे यांनी सांगितले.> पाण्यावरून बाचाबाची !लातूर : टँकरच्या पाणीवाटपावरून शहरातील जुना औसा रोड भागातील गणेश नगर येथे गुरुवारी नागरिक आणि नगरसेवकात बाचाबाची झाली. दारासमोरून जात असलेल टँकर थांबवून नागरिकांनी पाणी घेतल्यानंतरच हा वाद मिटला. आम्हाला पिण्यापुरते पाणी द्या त्यानंतर पुढे जा, असे म्हणत गणेश नगर येथे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास काही नागरिकांनी महापालिकेचे टँकर अडविले. नागरिकांची बाचाबाची सुरू असताना प्रभाग समितीच्या सभापती श्रीदेवी औसे यांचे पती शिवा औसे, नगरसेविका कविता वाडीकर यांचे पती, माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील, नगरसेवक अनुप मलवाडे हे टँकरजवळ आले. काही नागरिकांनी त्यांनाही जाब विचारला.जवळपास अर्धा तास गोंधळ सुरू होता. जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत टँकरला पुढे जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी टँकरला अडवून धरले. नागरिकांचा रोष पाहून नगरसेवकांनी काढता पाय घेतला. त्यानंतर इथल्या महिलांनी प्रत्येकी दोनशे लिटरप्रमाणे बॅरल भरून घेतले. (प्रतिनिधी)पाणी वाटपात राजकारण पाणी वाटपात मनपा प्रशासन व नगरसेवक राजकारण करीत आहेत. ठराविक भागातच टँकरचे पाणी दिले जात आहे. मुख्य रस्त्यावरील नागरिकांना पाणी मिळत नाही. आठ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्यामुळेच टँकर अडवून जाब विचारला. शिवाय, पाणीही भरून घेतल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्या स्वाती जाधव यांनी सांगितले.समान पाणी वाटपाचा प्रयत्न पाणीवाटपात कसल्याही प्रकारचा दुजाभाव नाही. सर्वच भागांत पाणी वाटप सुरू आहे. त्यामुळे यात दुजाभाव होत नाही, असे माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी सांगितले.