मुंबई : मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत आतापर्यंत राज्यभरात 3 लाख 50 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली असून पुणे विभागात सर्वाधिक 63 हजार रुग्ण तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात दिली. 1 डिसेंबरपासून ही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून ती 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या विभागांतर्गत मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला.राज्यात आशा कार्यकर्ती आणि एएनएम यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत जाऊन या मोहिमेसंदर्भात जाणीव जागृती केली जात आहे आणि त्यांची मौखिक आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 8 विभागा अंतर्गत आशा व एएनएमच्या माध्यमातून 2 लाख 12 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर राज्यभरातील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सामान्य रुग्णालय येथे 1 लाख 20 हजार नागरिकांनी स्वत: येऊन आरोग्य तपासणी करुन घेतली आहे. मोहिम सुरु झाल्यापासून 5 दिवसांमध्ये 3 लाख 50 हजार रुग्णांची तपासणी झाली असून या मोहिमेला अधिक गती देण्यात यावी, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.अकोला विभागात 54 हजार 595, औरंगाबाद विभागात 45 हजार 297, कोल्हापूर विभागात 24 हजार 325, लातूर विभागात 18 हजार 188, नागपूर विभागात 39 हजार 324, नाशिक विभागात 40 हजार 805, पुणे विभागात 62 हजार 472 आणि ठाणे विभागात 27 हजार 986 अशी रुग्ण तपासणी करण्यात आली आहे.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ 1 डिसेंबर रोजी मुंबईतील मालवणी शासकीय रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. या मोहिमे अंतर्गत राज्यातील 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची मौखिक तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी सर्व शासकीय, महापालिका,नगरपालिका दवाखाने येथे मोफत उपलब्ध असणार आहे. तसेच गाव पातळीवर ही तपासणी एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत करुन गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये उपचार हे पूर्णत: नि:शुल्क असणार आहेत. राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून लोकांनीही या मोहीमेत सहभागी होऊन मौखिक तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत आतापर्यंत साडेतीन लाख रुग्णांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 7:39 PM