राष्ट्रवादीला आतापर्यंत २० नेत्यांचा 'रामराम', आणखी नऊ जण तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 10:58 AM2019-07-27T10:58:42+5:302019-07-27T11:36:57+5:30
नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत.
मुंबई - देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
२०१४ मधील मोदी लाट २०१९ पर्यंत ओसरली अशी सर्वांची भावना होती. त्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत जोरदार तयारी केली होती. परंतु, मोदी लाटेनंतर देशात राष्ट्रवादाची अशी लाट आली की, त्या लाटेत विरोधकांची तारांबळ उडाली. नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत.
नेत्यांची पक्षांतर करण्याची अनेक कारणे आहेत. काही नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अनेक नेत्यांना आपल्या शिक्षणसंस्था, सुतगिरण्या, कारखाने यांचा वाढलेला व्याप सुरक्षित ठेवायचा आहे. त्यासाठी घेतलेले कोट्यवधीचं कर्ज कारणीभूत ठरत आहे. सत्ता नसल्यामुळे बँका घरापर्यंत येत आहेत. परंतु, सत्ताधारी पक्षासोबत असल्यास ही वेळ येणार नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे पक्षांतरवर नेत्यांचा भर वाढला आहे.
पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. यामध्ये बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहूल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मन ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावीत, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, पांडुरंग बरोरा या नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी देखील मोठी झाली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.